संसदेचे अधिवेशन आजपासून; आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांची शक्यता

Santosh Gaikwad January 31, 2024 10:00 AM

 
नवी दिल्ली :  संसदेचे अखेरचे अधिवेशन आज, बुधवारपासून सुरू होणार आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन गुरुवारी सकाळी अकरा वाजता लेखानुदान सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे.
 
राष्ट्रपती पहिल्यांदाच नव्या संसदेत हे नव्या वर्षांतील संसदेचे पहिले अधिवेशन असल्याने त्याची सुरूवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल. यानिमित्ताने राष्ट्रपती नव्या संसद भवनात पहिल्यांदाच प्रवेश करणार आहेत. इमारतीच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्याबद्दल विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेचा भडिमार केला होता. आगामी अधिवेशनात हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, मणिपूर, राम मंदिर, अदानी आदी प्रकरणांवर विरोधक केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. संरक्षणमंत्री व लोकसभेतील उपनेते राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्वपक्षीय बैठक झाली. त्यानंतर विरोधकांच्या सर्व मुद्दयांवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
 
खासदारांचे निलंबन मागे

 पावसाळी अधिवेशनात सभागृहात गोंधळ घातल्याचे कारण देत राज्यसभेतील ११ तर लोकसभेतील ३ खासदारांना निलंबित करून हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे सोपवण्यात आले होते. मात्र सरकारच्या वतीने सर्व खासदारांचे निलंबन मागे घेण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी निलंबन मागे घेतल्याचे सांगितले जात आहे.