पी.एस.खानोलकर स्मृती एसपीजी टेनिस स्पर्धेत, राजा-नरेश, वैभव-संजय जोडींची विजयीदौड !

Santosh Gaikwad March 10, 2024 09:39 PM


मुंबई :   शिवाजी पार्क जिमखाना आयोजित टेनिसपटू व संघटक पी.एस. उर्फ दादा खानोलकर स्मृती एसपीजी अखिल भारतीय दुहेरी टेनिस स्पर्धेत हैद्राबादचे राजा-नरेश, मुंबईचे वैभव-संजय, प्रथम मानांकित विकी-संदीप जोडींनी विजयीदौड केली. विजयासाठी राजा-नरेश जोडीला वैभव-अभिषेक जोडीने ८-६ असे शेवटपर्यंत अटीतटीमध्ये झुंजविले. सेक्युरिटी एचक्यू कंपनी प्रायोजित व एमएसएलटीए मान्यतेने ही स्पर्धा २५०  टेनिस मार्कर व सहाय्यक प्रशिक्षक यांच्या सहभागाने एसपीजी टेनिस कोर्टमध्ये रंगतदार होत आहे.


   मुंबईच्या वैभव पटेरे व संजय पटेल जोडीने सोलापूरच्या जयवंत-श्रीकांत जोडीचा ६-१ असा सहज पराभव करून तिसरी फेरी गाठली. प्रथम मानांकित विकी-संदीप जोडीने प्रारंभी उत्तम प्रतिकार करणाऱ्या सुभाष-अमन जोडीचे आव्हान ६-३ असे संपुष्टात आणले. अन्य सामन्यात भावेश-विजय जोडीने मुकेश-रितेश जोडीवर ६-२ असा तर नासुरीद्दिन-कैलाश जोडीने गजू-नानू जोडीवर ६-५ असा विजय मिळविला. स्पर्धेचे शानदार उद्घाटन शिवाजी पार्क जिमखान्याचे जनरल सेक्रेटरी संजीव खानोलकर, असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील रामचंद्रन, एमएसएलटीएचे माजी अध्यक्ष शरद कन्नमवार, अन्य पदाधिकारी तसेच प्रायोजक सेक्युरिटी एचक्यू कंपनीचे कार्यकारी अधिकारी संकेत खानोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेतील विजेत्यांसाठी टेनिस संघटक दादा खानोलकर स्मृती चषकासह एकूण रु.८०,०००/- रक्कमेचे आठ पुरस्कार आहेत. टेनिस रसिकांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून विशेषतः युवा वर्गाने टेनिस मार्कर अथवा सहाय्यक प्रशिक्षकाच्या सेवेस करिअर म्हणून पाहावे, हा देखील या उपक्रमाचा उद्देश आहे.

**********