सोने की चिडीया असलेल्या मुंबईला सरकारकडून लुटण्याचा प्रयत्न : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप

Santosh Gaikwad March 23, 2023 12:00 AM

मुंबई - दळणवळण,वाहतुकीसारखे मुंबईचे गंभीर प्रश्न सोडवण्यास सरकार कमी पडतय असा गंभीर आरोप  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केला. २६० अनव्ये प्रस्तावावर चर्चा करताना ते बोलत होते.   मुंबई खऱ्या अर्थाने सोने की चिडीया असून तिला लुटण्याचा काम सरकार करत असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला. 

  मुंबईचा स्वाभिमान जपायचा असेल तर मुंबईच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. कंत्राटदारांना पोसण्याचं कार्य बाजूला ठेऊन मूलभूत प्रश्न सोडवण्यावर सरकारने लक्ष दिले पाहिजे. मराठी जनतेचा स्वाभिमान जागरूक ठेवला पाहिजे, कोळी वाडयांचे सीमांकन निश्चित करण्यासाठी  केंद्र सरकारच्या परवानग्या घेतल्या पाहिजे.जनतेच्या हक्काच्या पैशातून क्लायमेट चेंज ऍक्शन प्लँन पुढे नेण्याची आवश्यकता आहे.अशा सूचना दानवे यांनी यावेळी सरकारला केल्या.मालाडमध्ये सातत्याने आग लागल्याचं प्रकार घडला, यामुळे सर्वसामान्यांची घरे रस्त्यावर येत असेल तर लक्ष देण्याची गरज त्यांनी वर्तवली. 

 मुंबईतील अनेक कार्यालय स्थलांतर करण्याचा घाट घातला जातोय, वस्त्रोद्योग आयुक्तालय मुंबई बाहेर गेल्यास मुंबईवर अन्याय होईल असे दानवे यांनी म्हटले.रस्ते कामं, फर्निचर , सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन आदी कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगत दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.  मुंबईतील स्ट्रीट फर्निचर, सुशोभीकरण, सौंदर्यीकरण आदींवर कोट्यवधी रुपये खर्च करून कंत्राटदारांना पोसण्याचं काम सुरू आहे. जुनी काम नव्याने करून स्वतःची पाठ थोपठण्याचा काम सरकार करत असल्याचे सांगत त्यांनी सरकारने विविध कामात कंत्राटदारांचा फायदा केल्याप्रकरणी सरकारला धारेवर धरले.