परिक्षा घोटाळ्यावर श्वेतपत्रिका काढा : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक !

Santosh Gaikwad February 29, 2024 03:01 PM


मुंबई, दि. २९ः दिवसागणिक पुढे येणाऱ्या पेपरफुटीचे प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी आणि परिक्षा घोटाळ्यांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी विरोधकांनी करत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. सरकार विरोधात यावेळी घोषणाबाजी केली. 

राज्यात सतत होणाऱ्या पेपरफुटीच्या प्रकरणाने विद्यार्थी त्रस्त आहेत. सरकार मात्र फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. पेपरफुटीला प्रोत्साहन व संरक्षण, हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणा विरोधकांनी पायऱ्यांवर दिल्या. तसेच राज्यात विविध विभागांच्या पेपरफुटी प्रकरणी एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी केली.   

पेपरफुटीमुळे गरिब विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते. ज्यांच्याकडे पैसे आहेत, अशा लोकांचे रॅकेट महाराष्ट्रात कार्यरत आहे. आठ दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात पेपर फुटीचे प्रकरण घडल्यानंतर त्यांनी सर्व परीक्षा रद्द केल्या. सरकारने अशाच प्रकारची ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी केली. महाराष्ट्र सरकारने पेपरफुटीला प्रोत्साहन देण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतान केली.