काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवा : नाना पटालेंचे आवाहन

Santosh Gaikwad 20, 7-07 07:31 PM


मुंबई, दि. ७ जुलै : काँग्रेस हाच सर्व समाज घटकांचा विचार करणारा व सर्व समाज घटकाला संधी देणारा पक्ष आहे. प्रत्येक समाज घटकाचा आवाज ऐकला गेला पाहिजे यासाठीच सेल व विविध विभागांची स्थापना करण्यात आलेली आहे. या सेल व विभागाचे राज्यभर लाखो पदाधिकारी आहेत. या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. 


काँग्रेसच्या विभाग व सेलची एक दिवसीय कार्यशाळा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना नाना पटोले म्हणाले की, आदिवासी, भटके विमुक्त, दिव्यांग, संघटीत, असंघटीत कामगार, सहकार, विधी, डॉक्टर, इंजिनिअर, कृषी विभाग व समाज घटकांचे सेल स्थापन करण्यात आले आहेत. राज्यात आज विविध घटकांचे ३९ सेल कार्यरत आहेत. सेलच्या पदाधिकाऱ्यांचे जाळे राज्यभर आहे, हे सेल व विभाग काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. तुम्हाला काँग्रेस पक्षाने संधी दिलेली आहे, या संधीचे सोने करा. लोकांपर्यंत जा, त्यांच्या समस्या समजून घ्या व ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा.देशात व राज्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहेत, काँग्रेस पक्षावर लोकांचा विश्वास आणखी दृढ होत आहे. चांगले काम करा राज्यात व देशात काँग्रेसची पुन्हा विजयी पताका फडकेल असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाची प्रस्तावना माजी मंत्री व सेल व विभागचे प्रभारी सुनिल देशमुख यांनी केली, सुत्रसंचालन समीर वर्तक यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण व प्रदेश सचिव मनोज शिंदे यांनी केले.