ठरलं ! ५ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ रामलल्लाचे दर्शन घेणार

Santosh Gaikwad January 25, 2024 06:52 PM


 

मुंबई, दि. २४ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा येत्या ५ फेब्रुवारीला अयोध्येला जाण्याचा मुहूर्त निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळासह रामलल्लाचे दर्शन घेतील. आमदार, खासदार आणि तीनही पक्षातील पदाधिकारीअयोध्येला जाऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मित्र पक्षांसह मंत्री आणि मंत्रिमंडळाला आणण्याचे नियोजन भाजपने केले असून त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आल्याचे आल्याचे समजते.  

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाणे टाळले. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आमदार, खासदारांसह अयोध्येला जाणार असल्याचे यावेळी सांगितले. आता श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी लीग लागली आहे. देश-विदेशातून भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारचे शिष्ठमंडळ अयोध्येला जाणार आहे. त्यानुसार ५ फेब्रवारीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. एकाच विमानातून संपूर्ण मंत्रिमंडळ अयोध्येला पोहोचणार आहे. संपूर्ण मंत्रिमंडळासह शिंदे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. सोबतच शरयु किनारी महाआरती करतील आणि हनुमानगढीचेही दर्शन घेणार असल्याचे समजते. 


अयोध्येत राम मंदिर व्हावे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. आता राम मंदिर निर्माण झाल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी केली जाणार आहे. राज्य सरकारचे शिष्ठमंडळ अयोध्येला रवाना होताना मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. देशातील वातावरण राममय झाल्याने सत्ता असलेल्या राज्यातील सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन अयोध्या वारी करण्याचे निर्देश केंद्रातून देण्यात आले आहेत. या संदर्भातील वेळापत्रक प्रत्येक राज्यांना दिले असून महाराष्ट्राला ५ फेब्रुवारीचे निमंत्रण देण्यात आल्याचे समजते. भाजपच्या वेळापत्रकानुसार ३१ जानेवारीपासून अयोध्या वारीला सुरूवात होईल. त्रिपुरा राज्यापासून वारी सुरू होणार असून ४ मार्चला मध्यप्रदेशातील मंत्री आणि मंत्रिमंडळाचा वेळापत्रकानुसार शेवटचा दौरा असणार आहे.