ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे...

Narendra Wable March 24, 2023 12:00 AM



आमच्या लहानपणी, ६० च्या दशकात, एका तोळ्यात १२ ग्रॅम सोने यायचे. सराफांच्या पेढ्यांवर प्रत्येक दिवसाचे प्रति तोळा सोन्याचे भाव फलकावर खडूने लिहिलेले असायचे. आमच्या आठवणीप्रमाणे आम्ही पाहिलेला कमीतकमी सोन्याचा भाव हा ५०० रुपये प्रति तोळा होता. त्यानंतर तो वाढत गेला. आमच्या चाळीसमोर वनाजी केसाजी नावाची एका मारवाड्याची १०० वर्षांची जुनी पेढी होती. तेथे देखील सोन्याचे भाव रोज वाचावयास मिळायचे. एक दिवस सोन्याने अचानक उसळी मारली. त्या दिवशी फलकावर भाव होता ३००० रुपये प्रति तोळा. तो भाव वाचून आमचे बाल नेत्र देखील विस्फारले. त्यावर पेढीचे मालक भेरूलाल जैन आमच्याकडे पाहून म्हणाले, ‘येथून पुढे सोन्याचे भाव वाढतच जाणार. आता ते कधीच खाली येणार नाहीत.’ जैन यांचे म्हणणे खरे ठरले. त्यानंतर गेल्या ५०-५५ वर्षांत सोन्याचे भाव गगनाला जाऊन भिडलेले आहेत. ज्यांनी फार पूर्वी सोने विकत घेतले असेल त्यांची आता पंढरी पिकली आहे. पण लग्न कार्यासाठी आता नव्याने सोने विकत घ्यायचे असल्यास ते सामान्य माणसाचे काम राहिलेले नाही.


     गुढी पाडवा हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी सोने खरेदीची चढाओढ दिसून येते. या वर्षी देखील पाडव्याला सोन्याची मोठी उलाढाल झाली. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या जळगावात सोने खरेदीस उत्तम प्रतिसाद मिळाला. गुढी पाडव्याच्या दिवशी जळगावात २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या प्रति तोळा दरात प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याचा प्रति तोळा दर ५८ हजार ७०० रुपये होता. २ फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर प्रति तोळा ५८ हजार ८८० रुपये होता. त्यानंतर महिनाभर सोन्याच्या भावात चढ-उतार सुरूच होता. गुढी पाडव्याच्या दोन दिवस आधी सोने प्रति तोळा ६० हजारांपुढे गेले होते. सोमवारी हा दर ५९ हजार ७५० रुपये होता. तीन दिवसांत सोन्याच्या दरात प्रति तोळा सुमारे १ हजार ५० रुपयांची घसरण झाली. तथापि, सोन्याची मागणी या पुढे वाढतच जाणार आहे. सोने ६२ हजारांचा टप्पा लवकरच पार करील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सारांश, सोने झपाट्याने सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर चालले आहे. 


    सोन्याचे आकर्षण हे सर्वांनाच असते. महिलांना ते अधिक असते. दागिने खरेदी करताना मंगळसुत्र, अंगठी व इतर कलाकुसरीचे दागिने करण्यास पसंती दिली जाते. कलाकुसरीच्या बारीक सोनपोत, कर्णफुले, गव्हाळ मणी, डिझायनर पँडल इत्यादी दागिन्यांना अधिक मागणी दिसून येते. त्याचबरोबर काही पुरुषांनाही अंगावर सोने मिरवणे आवडते. त्यांना स्वत:ला गोल्डमॅन म्हणवून घेणे आनंददायी वाटते. म्हणूनच पुरुषांची सोनसाखळी, अंगठ्या आणि ब्रेसलेट यांना देखील मागणी दिसून येते. 


     खरे म्हणजे अंगावर सोने मिरवणे म्हणजे संकटाला आमंत्रण होय. पुण्यातील एका गोल्डमॅनचा निर्घुणपणे खून झाला होता. अर्थात तो खून त्या सोन्यापायी नव्हता. तर ज्या वाममार्गाने त्याने पैसे कमवून स्वत:ला सोन्याने मढवून घेतले त्या पापातून तो झाला होता. गॉडफादर कादंबरीच्या प्रारंभीच एक सुंदर वाक्य आहे. Behind every big fortune there is a crime. (प्रत्येक मोठ्या घबाडामागे गुन्हा दडलेला असतो.) पुण्यातील गोल्डमॅनच्या दुर्दैवी हत्येनंतर याचा प्रत्यय आला. खरे म्हणजे सोने हे रात्री बारा वाजता देखील चालणारे खणखणीत चलती नाणे आहे. ऐनवेळी एखाद्याला पैशांची गरज भासली तर सोने गहाण ठेवून ती गरज भागवता येते. पूर्वी कर्ज देणारे सावकार भरमसाठ व्याज आकारून सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करीत. पण आता सहकारी बँका, पतपेढ्या, राष्ट्रीयीकृत आणि खासगी बँका येथे देखील वाजवी दरात सोन्यावर कर्ज मिळते. जसजसा सोन्याचा भाव वाढत जातो तसतशी कर्ज म्हणून मिळणारी रक्कम देखील वाढत जाते. तेव्हा शहाण्या माणसाने जवळ असलेले सोने जपून ठेवणेच योग्य. तसेच नियमितपणे शक्य तितके सोने खरेदी करणे हे देखील योग्य आहे. काही लोक तर फार व्यवहार चतूर असतात. एकदम सोने खरेदी करणे शक्य नसते म्हणून काही मंडळी दर महिन्याला ठराविक प्रमाणात सोने खरेदी करत राहतात. दिवसेंदिवस सोन्याचा भाव वाढत जातो. परिणामी, सोन्यात केलेल्या गुंतवणुकीची गोड फळे भविष्यात चाखायला मिळतात. तेव्हा प्रत्येकाने ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे...’ म्हणत नियमितपणे थोडे थोडे सोने खरेदी करणे हितावह आहे. दि. २२ मार्च रोजी होऊन गेलेल्या गुढी पाडव्या निमित्त हाच संदेश आम्ही आमच्या प्रिय वाचकांना देऊ इच्छितो.