मुंबई प्रतिनिधी : मुस्लिम समाजातील पवित्र यात्रा मानल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी खासगी दूर ऑपरेटरना मंजूर केलेला ४२ हजार जणांचा कोटा रद्द करण्यात आल्याने हज यात्रेसाठी पैसे भरलेल्या भाविकांमध्ये नाराजी आहे. मात्र, यात्रेसाठी भरलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. संबंधित यात्रेकरूंना पुढील वर्षी होणाऱ्या हज यात्रेसाठी प्राधान्याने पाठविण्यात येईल, अशी ग्वाही संघटनेने दिली. ऑल इंडिया हज अॅण्ड उमराह टूर ऑर्गनायझर असोसिएशनने शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
सौदी अरेबियाचे सरकार, भारत सरकार व टूर ऑपरेटर यांच्यामधील संवादाअभावी पैसे भरूनही काही अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, सौदी सरकारने हा कोटा रद्द केला. ज्या यात्रेकरूंनी पैसे भरलेले आहेत, त्यांना यंदा जाणे अशक्य झाले आहे. त्यांना पुढील हज यात्रेसाठी प्राधान्याने हजला पाठविण्यात येईल. ज्या यात्रेकरूंना हजला जाण्याऐवजी पैसे परत हवे असतील, त्यांना ते पैसे परत केले जातील. त्यासाठी आवश्यकता भासल्यास कायदेशीर कागदपत्रे तयार करून त्यांना दिलासा दिला जाईल, अशी ग्वाही असोसिएशनचे अध्यक्ष शौकत तांबोळी,इम्रान अल्वी आणि अब्दुल कादीर यांनी दिली.
यात्रेकरूंचे भरण्यात आलेले शुल्क विदेशी चलनात पाठविण्यात आलेले असल्याने पुढील वर्षी या यात्रेकरूंच्या हजच्या खर्चात वाढ होणार नाही.
सौदी अरेबियाने भारताला हज समितीसाठी १ लाख २२ हजार ५१७ व खासगी टूर ऑपरेटरसाठी ५२ हजार ५०७ चा कोटा मंजूर केला होता. खासगी ऑपरेटरचा कोटा आता १० हजार आहे.
सौदीतील बदललेल्या नियमांचा फटका ज्याप्रमाणे भारतातील हज यात्रेकरूंना बसला, त्याप्रमाणे १० ते १२ देशांना हा फटका बसला असून, एकूण सुमारे ५ ते ६ लाख यात्रेकरूंना हज यात्रा करण्यापासून वंचित राहावे लागणार आहे, असे संघटनेने सांगितले.