नीलेश राणे यांची राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा ; अचानकपणे बाजूला का झाले? भाजपमधील बड्या नेत्यावर नाराज ?

Santosh Sakpal October 24, 2023 06:22 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत असून आता राजकरणात मन रमत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी नीलेश राणे यांनी स्वत: ही माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजप नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी अचानकपणे राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. त्यांनी असा तडकाफडकी निर्णय का घेतला, याचा कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण भाजपमधील बड्या नेत्यावर नाराज असल्याने नीलेश राणेंनी हा राजकारणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

या संदर्भात नीलेश राणे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या 19/20 वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे. मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र!'

नीलेश राणे यांच्या या ट्विटमुळे राज्यातील राजकीय चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहेत. नीलेश राणे यांनी हा निर्णय का घेतला? याचे कारण अद्याप तरी अस्पष्ट आहे. नीलेश राणे ट्विटने चर्चेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मोठी खेळी असल्याचे बोलले जात आहे. कोकण आणि राणे असे समीकरण गेल्या काही वर्षात कोकणात पाहायला मिळत आहे.

दरम्यान, नीलेश राणे माजी खासदार राहिले आहेत. पण सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या राजकारणात इतरांची जास्त ढवळाढवळ होत वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांचे भाजपच्या नेत्यांसोबत खटके उडत होते. 

आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही असे ट्वीट नीलेश राणे यांनी केले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. नीलेश यांनी आपल्या कुटुंबियांनाही याची कल्पना न देता राजकारणातून बाजूला होण्याचे ट्विट केले. नीलेश राणेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे समर्थकांमघ्ये नाराजी पसरली असून समर्थक निलेश राणेंची भेट घेणार आहेत. तशा प्रकारच्या कमेंट देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

माजी खासदार नीलेश राणेंनी सक्रिय राजकारणातून कायमचे बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. नीलेश राणे यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली. एकीकडे दसरा मेळाव्याची धामधूम सुरू असताना नीलेश राणे यांनी घेतलेला निर्णय चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, बेधडक नीलेश राणे यांच्या रोखठोक शपथेची आठवण झाल्याशिवाय आज राहणार नाही.

नीलेश राणे 2009 मध्ये खासदार झाले होते. त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. वयाच्या 28 व्या वर्षी ते खासदार झाले. मात्र पुढे राजकीय परिस्थिती बदलली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पहिल्यांदा पराभव केला.

दरम्यान, नीलेश राणे यांनी आता सक्रिय राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्यामागची कारणे काय याची चाचपणी सगळीकडे सुरू आहे. कोकणात सध्या उमेदवारीवरून अनेक अंतर्गत घडामोडी घडत आहेत. त्यामुळेच नीलेश राणेंनी हा निर्णय घेतलेला असू शकतो.

कुडाळमधून लढण्यासाठी तयारी होती

नीलेश राणे हे यावेळी लोकसभाऐवजी विधानसभा निवडणुकीची तयारी करत होते, अशी माहिती आहे. सिंधुदुर्गातील कुडाळ मालवण या विधानसभा मतदारसंघातून लढण्याची त्यांची तयारी होती. सध्या कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक विद्यमान आमदार आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांनी विद्यमान केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे यांचा पराभव केला होता. वैभव नाईक हे 2014 आणि 2019 असे दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत.