... म्हणून ठाकरे गटाचा त्याग केला :निलम गोऱ्हे यांनी स्पष्टच सांगितले

Santosh Gaikwad July 12, 2023 06:37 PM


मुंबई : पक्षाची उपनेता, प्रवक्ते पद असतानाही निर्णय प्रक्रियेत डावलले जात असल्याच्या कारणावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा त्याग केला असे स्पष्टीकरण विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. काही दिवसांपूर्वीच निलम गो-हे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. गो-हे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांनीही आपणाला विश्वासात घेतले जात नसल्याचे म्हटले होते. मात्र संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे, असे लोक म्हणत असले तरी नेते सांगतात तसे संजय राऊत बोलतात. नेत्यांमुळे संजय राऊत यांचा बळी जात आहे, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

   

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात १९९८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा जे ध्रुवीकरण झाले होते, तशीच ध्रुवीकरणाची परिस्थिती २०२४ च्या आधी येणार आहे. त्यात राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरची योग्य भूमिका घेणारा पक्ष म्हणून एकनाथ शिंदेंबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. कोणतेही पद डोळ्यांसमोर ठेऊन शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष संघटनेत गती येईल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर बंदिस्त राजकारण झाले. त्यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर आणि आजारी पडल्यानंतर चर्चेची दार बंद झाली. आता त्यांना जास्त त्रास द्यायला नको म्हणून, त्यांच्यावरचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.


शिवसेनेने आपल्याला विविध पदे दिली. मोठे केले. पण पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत स्थान नसेल तर त्याचा उपयोग काय, असा प्रश्न करतानाच ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे तत्त्व होते. पण तेच आता मागे पडले आहे.   समाजकारणासाठी लोक भेटायला उत्सुक असतात, पण ते वेळच देत नसतील तर लोकांना सांगायचे काय, असा प्रश्नही नीलम गोऱ्हे यांनी केला. तसेच ठाकरे गटात संवादाचा अभाव असल्याचे गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. संजय राऊत यांनी खूप मदत केली. माझ्या आमदारकीच्या वेळेस त्यांनी मदत केल्याचे गोऱ्हे म्हणाल्या. पण सध्याच्या राजकारणात राऊतांचा बळी केला असल्याचे त्या म्हणाल्या. संजय राऊत यांनी टोकाचे बोलू नये. वैचारिक मांडणी करावी, असा सल्ला त्यांनी दिला.

 

निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरेंची मूळ शिवसेना पक्ष म्हणून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील पक्षालाच मान्यता दिली आहे. त्यामुळेच धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे आहे. जेव्हा एकनाथ शिंदे  गुवाहटीवरून परत आले, मुख्यमंत्री झाले. त्यावेळी हा विषय तात्पुरत्या स्वरुपाच्या मंत्रीपदाचा असावा, असे वाटत होते. त्यावेळी पक्षातून ६३ पैकी ४० एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार सोडून गेले. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नीतीधैर्य खचत असल्याची जाणीव झाली. त्यानंतर पक्षात संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने काही बदल होतील, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे समजून घेतलं जाईल, असे वाटत होते. मात्र, तसे काही झाले नाही. एक वर्षानंतरही अनेक ठिकाणच्या लोकांशी बोलणे झाले, त्यावेळी लक्षात आले की पक्षाच्या कार्यकर्त्यांचं नीतीधैर्य खचत चाललं आहे. याला कारण म्हणजे रोज सकाळी होणारा वादविवाद. एवढा एकच कार्यक्रम, असा आरोप नीलम गोऱ्हेंनी केला. संपूर्ण मुलाखती दरम्यान त्यांनी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलणे टाळले.