राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच, अजित पवारांसह आणखी तीन नावे चर्चेत !

Santosh Gaikwad June 22, 2023 07:18 PM

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदात मला इंटरेस्ट नसून, संघटनेत काम करण्याची इच्छा दर्शविल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र अजित पवारांबरोबरच आता पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसीला प्रदेशाध्यक्षपद देण्याची इच्छा दर्शविली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. 


काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन दिल्ली येथे पार पडला. राजधानीत झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांनी मोठी घोषणा करीत, पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केली होती. तर सुनिल तटकरे यांना पक्षाचे सरचिटणीस केलं आहे. मध्यप्रेदश, गुजरात, राजस्थान, झारखंडची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे तर महाराष्ट्र, हरयाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर सुनील तटकरे यांच्यावर ओडीशा आणि पश्चिम बंगालची जबाबदारी दिली आहे. तसेच डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यावेळी अजित पवार यांच्यावर कोणतीच जबाबदारी सोपवली नसल्याने त्याची चांगलीच चर्चा रंगली होती.


शरद पवार यांनी मागील महिन्यात राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांनी उपोषण करत राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांचा मान राखून शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला होता. हे सगळं घडत असताना त्यांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. भाकरी वेळेत फिरवली नाही तर ती करपते. हे वक्तव्य केल्यानंतर भाकरी फिरवण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 


राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शरद पवारांसमोरच अजित पवार यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा दर्शविली. आपल्याला कोणतीही जबाबदारी मिळाली तरी आपण तिला न्याय देण्याचा प्रयत्न करु, असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर अजित पवार यांनी प्रदेशाध्यपदावर दावा केल्याचे बोललं जात होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी देखील प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांचा दाखला देत राष्ट्रवादीने देखील ओबीसींना प्रदेशाध्यपद द्यावे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.


ओबीसी नेत्याला जबाबदारी द्यावी 

भुजबळ म्हणाले, पक्षाला ओबीसी नेता मिळाला तर पक्ष आणखी मजबूत होण्यास मदत होईल. यामुळे ओबीसी समाज मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेससोबत जोडला जाऊ शकतो. राष्ट्रवादीत तटकरे, मुंडे, आव्हाड आहेत त्यांना प्रदेशाध्यक्ष केले जाऊ शकते किंवा मलाही जबाबदारी दिली तर मीही काम करेन असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार असल्याने प्रदेशाध्यक्ष पदी ओबीसी समाजाचे नेत्याला संधी द्यावी असे भुजबळ म्हणाले. भाजपने ओबीसी असलेल्या बावनकुळेंना प्रदेशाध्यक्ष केलं, काँग्रेसनेही ओबीसी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. शिवसेनेत तशी पद्धत नाही, पण त्यांचा देखील दुसऱ्या क्रमांकाचे नेते संजय राऊत देखील ओबीसी आहेत. तसेच आमच्या पक्षात ओबीसी नेत्याला जबाबदारी दिली पाहिजे असे छगन भुजबळ म्हणाले.