नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दोन महिन्यांसाठी जामीन

Santosh Gaikwad August 11, 2023 04:51 PM


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना तब्बल एका वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज दोन महिन्यांसाठी मंजूर केला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला. 


मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी 2022 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अन् गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार तसेच त्यांच्या बहिणीशी जमीन व्यवहार प्रकरणामुळे मलिक अडचणीत आले होते. अटक केल्यानंतर त्यांनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने प्रकृतीच्या कारणामुळे वैद्यकीय कारणासाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला.


काय आहे प्रकरण

ईडीने दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी इक्बाल कासकर याला मनी लॉण्ड्रींग प्रकरणात अटक केली होती. त्याच्या चौकशीदरम्यान मलिक यांचे नाव पुढे आले होते. दाऊद इब्राहिम हा रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो. यामध्ये मलिक यांचा सहभाग असल्याचा आरोप मलिक यांच्यावर ठेवण्यात आला होता. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने   धाड टाकली होती.