निसर्गकवी काळाच्या पडद्याआड ! ना. धो. महानोर यांचं निधन

Santosh Gaikwad August 03, 2023 09:53 AM

पुणे : ज्येष्ठ कविवर्य ना. धो. महानोर यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून  पुण्यातील रूबी हॉस्पीटलमध्ये ते व्हेंटीलेटरवर होते. मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून प्रसिद्ध होते. मराठी काव्यविश्‍वात निसर्गकवी म्हणून महानोरांना ओळखले जाते.  


निसर्गात रमणारा कवी अशी त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या कवीतांमध्ये खास करुन बोलीभाषांचा वापर केला. ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कवितां'ना खरा मातीचा गंध यायचा. त्यांच्या गीतांमधून-कवितांमधून निसर्गाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडायचं. त्यांनी जशी निसर्गाची वर्णन करणारी गीतं लिहिली, तशा ठससेबाज लावण्याही लिहिल्या. श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' ही लावणी लोकप्रिय झाली. आशा भोसले यांनी 'एक होता विदूषक' या चित्रपटासाठी गायली आहे. आम्ही ठाकर ठाकर, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांबुळ पिकल्या झाडाखाली, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती अशी एकाहून एक सर गाणी ना.धों. महानोर यांनी लिहिली.


 नामदेव धोंडो महानोर असे त्यांचे पूर्ण नाव होते.  महानोरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले.  निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. या कवितेत निसर्गाचे विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत, निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला व रोमांचित करणारा शृंगार आहे.  ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. महाराष्ट्र विधानपरिषदेत आमदार म्हणून काम केले. 


महानोर यांची पुस्तके

कवितासंग्रह- अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ,जगाला प्रेम अर्पावे, त्या आठवणींचा झोका, दिवेलागणीची वेळ, पक्षांचे लक्ष थवे, पानझड, पावसाळी कविता , गपसप (कथासंग्रह) गावातल्या गोष्टी (कथासंग्रह), पळसखेडची गाणी (लोकगीते), पु. ल. देशपांडे आणि मी, यशवंतराव चव्हाण, यशवंतराव चव्हाण आणि मी, शरद पवार आणि मी (व्यक्तीचित्रण), या शेताने लळा लाविला, शेती, आत्मनाश व संजीवन, कापूस खोडवा (शेतीविषयक)


महानोरांची गीते असलेले चित्रपट

ना. धो. महानोर यांनी चित्रपटांसाठी लिहीलेली गीतेही विशेष गाजली यामध्ये एक होता विदूषक चित्रपटातील, जाळीमधी झोंबतोया गारवा, तुम्ही जाऊ नका हो रामा, सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा या गीतांचा उल्लेख करावा लागेल. खास करुन लावणी या साहित्यप्रकारात त्यांनी चित्रपटासाठी लिहीलेली 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' ही लावणी प्रचंड गाजली. श्रावणातील उन्ह आणि स्त्रीच्या मनातील उल्लड भावना त्यांनी या लावणीत शब्दबद्ध केली आहे. मधल्या काळात 'दूरच्या रानात केळीच्या बनात' हे त्यांचे गीत प्रचंड गाजले होते. याशिवाय त्यांनी अबोली, एक होता विदूषक , जैत रे जैत, दूरच्या रानात केळीच्या बनात (आल्बम), दोघी, मुक्ता, सर्जा, मालक, ऊरुस, अजिंठा, यशवंतराव चव्हाण या चित्रपटांसाठी गीतलेखन केले.


पुरस्काराने सन्मानित 

भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार,  जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार,  पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल 'वनश्री' पुरस्कार 'कृषिरत्न' शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्द्ल सुवर्ण्पदक  डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार,  साहित्य अकादमी पुरस्कार, २०१२ मध्ये राज्य शासनाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्ककार अशा विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले .