महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित, दोन दिवसात निर्णय: नाना पटोले

Santosh Gaikwad March 21, 2024 08:16 PM


 
मुंबई : महाविकास आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकपा या मित्रपक्षांशी बोलणी झालेली आहे, वंचितसोबतही आजही चर्चा झाली आहे. काँग्रेस पक्षाचे उमेदवारही जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व मित्र पक्षांशी चर्चा करून महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवार दोन तीन दिवसात जाहीर होतील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे.

टिळक भवन मध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आज सकाळी चर्चा झाली. या चर्चेत काँग्रेसकडून मी तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलणी केली. जागा वाटपाबरोबर प्रचार सभा व इतर मुद्द्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. राज्यातील सर्व ४८ जागा महाविकास आघाडीत लढवत आहे. आघाडीतील सर्व मित्रांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. चर्चेनंतर काही जागांची अदलाबदल होऊ शकते आणि याबाबतचा निर्णय दोन दिवसात होईल.  
 
भारतीय जनता पक्षाने मागील १० वर्षात देश बरबाद केला आहे. लोकशाही, संविधानाला न जुमानता मनमानी कारभार केला आहे. महाविकास आघाडी मजबूत करून भाजपाच्या या अत्याचारी सरकारला सत्तेतून खाली खेचणे हेच लक्ष्य आहे. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला त्या आसुरी शक्तीविरोधात काँग्रेसचा लढा आहे. परंतु भाजपाकडे मुद्देच नसल्याने त्यांनी शक्ती शब्दाचा विपर्यास केला आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत असताना, देशभरात महिला अत्याचार होत असताना भाजपा व मोदींना नारी शक्तीची आठवण का झाली नाही आजच नारी शक्ती कशी आठवली?  गुजरातमध्ये एकाच टप्प्यात मतदान होत आहे, महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेण्याची काही गरज नव्हती परंतु भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेतले जात आहे.
 
लोकसभा निवडणूक लढवणार का, या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मी काँग्रेस पक्षाचा एक शिपाई आहे, पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य आहे. २०१९ मध्ये पक्षाने आदेश देताच नागपूर लोकसभा निवडणूक लढवली होती, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.  या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह आदी उपस्थित होते.