सत्तेची नशा देश उध्वस्त करते ; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Santosh Gaikwad April 16, 2023 11:19 PM

नागपूर : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा धागा पकडत ठाकरे म्हणाले, देशातील गल्लीबोळात घराणेशाही बोलणाऱ्या गृहमंत्र्यांना समाजसेवा करणाऱ्या घराण्यासमोर झुकावं लागलं. आप्पासाहेब धर्माधिकारींचे काम मोठं आहे. ते व्यसनमुक्तीचे काम करतात. दारूची नशा घर उद्ववस्त करते, सत्तेचे व्यसन देश उद्धवस्त करते अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांनी  भाजपवर निशाणा साधला.

नागपूर येथे झालेल्या माविकास आघाडीच्या वज्रमुठसभेत राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, सुनील केदार आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे हे अलीकडेच अयोध्या दौऱ्यावर गेले होते. यावर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले की, अयोध्येला मीसुद्धा गेलो होतो. ती वेळ वेगळी होती. राम मंदिराचा मुद्दा कोर्टात होता. आधी मंदिर मग सरकार, आम्ही मोदींना सांगितलं. मोदी म्हणाले आता नको. आता हे टिकोजी राव फणा काढतोय. हे रामभक्त असते तर सुरतला नाही तर अयोध्येला गेले असते. आताचे उपमुख्यमंत्री आधी कधी अयोध्येला गेले नाहीत. माझा शर्ट अधिक भगवा दाखवण्यासाठी गेले,' अशी टीका उद्धव ठाकरेंनी  फडणवीस यांच्यावर केली.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. कोरोना काळात मी घरातून काम केले. त्यावरून विरोधक टीका करत असतात. मी घरातून काम केलं तरी लोकांच्या सहकार्याने आपण कोरोनाचा मुकाबला केला. काम करायची इच्छा असेल तर कुठूनही करता येते. वणवण फिरले म्हणजे खूप काम केलं असं नसते अशा कानपिचक्याही उद्धव ठाकरे यांनी दिल्या. 'उलट्या पायाचं सरकार आलं आणि सतत गारपीट होत आहे. हे सरकार अवकाळी आहे अशी टीका ठाकरे यांनी केली.

भाजपच हिंदुत्व गोमूत्रधारी

काँग्रेसबरोबर गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असा आरोप होतो. संघाला विचारायचं आहे की तुमचं आणि भाजपचं चाललंय काय? आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं नाही. संभाजीनगरला सभा झाली, त्यांनी गोमूत्र शिंपडलं, यांचं हिंदुत्व गोमूत्रधारी आहे अशी टीका ठाकरे यांनी केली. जग कुठे चाललंय, यांचं काय चाललंय. तिथेही मुसलमान आलेले, इथेही मुसलमान आलेले. मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. मी गेलो असतो तर? उत्तर प्रदेशात मदरशात जाऊन कव्वाली गाणार. जो जीव द्यायला तयार आहे तो हिंदू आहे. 2014 साली भाजपने युती तोडली होती. वचन तुम्ही मोडलंत. हे हिंदुत्व नाही असे ठाकरे म्हणाले.

फडतूस म्हणजे बिनकामाचा

एका महिलेला गुंडांकरवी मारहाण होते. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेतला जात नाही.  गृहमंत्री फडतूस आहे की नाही? दुसरा काय शब्द वापरणार? फडतूस म्हणजे बिनकामाचा. काय हे हिंदुत्व, काय हा कारभार- संघाला मान्य आहे का, विश्वगुरु मोदींना मान्य आहे का? गृहमंत्र्यांना मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करीत फडणवीस यांच्यावर पुन्हा टीका केली.

बाबरी मशीद पाडली, तेव्हा शिवसैनिक नव्हते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मग बाबरी पाडायला तुमचे काका गेले होते का? आणि चंद्रकांत पाटलांनी केलेलं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तरी मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर आणि  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांना संबोधून जयंत पाटील म्हणाले की, कुछ तो मजबुरियां रही होंगी, यूं कोई बेवफ़ा नहीं होता असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेेंना त्यांनी टोला लगावला आहे.

यावेळी काँग्रेसचे नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री अनिल देशमुख आदींची भाषणे झाली.