मुरबाड रेल्वेसाठी संपादित जमिनीचा दर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच ठरणार : कपिल पाटील

Santosh Gaikwad June 09, 2023 05:28 PM


ठाणे  : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी शेतकऱ्यांकडून संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीचा दर हा बाधित शेतकऱ्यांना विश्वास घेऊन शेतकरी व रेल्वे प्रशासन यांच्यात सविस्तर चर्चा केल्यानंतरच ठरविण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, असे आवाहनही  कपिल पाटील यांनी केले. या वेळी माजी आमदार गोटीराम पवार, माजी आमदार दिगंबर विशे, सुमनताई शांताराम घोलप, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार, भाजपाचे तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, सुभाष घरत, उल्हास बांगर, भिवंडी लोकसभा निवडणूकप्रमुख मधुकर मोहपे, दीपक खाटेघरे आदींसह सर्वपक्षीय नेते-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची तब्बल सात दशकांपासून प्रतिक्षा केली जात होती. कल्याण ग्रामीण व मुरबाड तालुक्याच्या विकासासाठी हा रेल्वेमार्ग `मैलाचा दगड' ठरणार आहे. त्यादृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याबरोबरच नीती आयोगाच्या उपाध्यक्षांकडे पाठपुरावा करून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रकल्पाला मंजुरी मिळविली होती. राज्यात प्रथमच रेल्वे, महसूलसह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन अवघ्या १५ दिवसांत जमिनीची मोजणी पूर्ण करून प्रक्रिया पार पाडली. सर्व सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजाविलेली ही कामगिरी कौतुकास्पद आहे, याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांचे पत्रकार परिषदेत जाहीरपणे कौतुक केले होते. त्याचबरोबर जमीन मोजणीसाठी तत्काळ सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचेही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आभार मानले. रेल्वे अधिनियम १९८९ च्या कायद्यानुसार रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कायद्यातील कलम २० ए नुसार प्राथमिक अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व बाधित शेतकऱ्यांना नोटीस देऊन जमिनीची मोजणी करण्यात आली. तसेच उपविभागीय कार्यालयाकडून जमिनींना देय असलेल्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांची मते जाणून घेतली आहेत, अशी माहिती  राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली.


पूरस्थितीच्या शंका निराधार

रेल्वेमार्गामुळे पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याच्या शंका निराधार आहेत. प्रत्यक्ष रेल्वेमार्गाचे काम करताना सर्व बाबींची काळजी घेतली जाईल. त्याचबरोबर मुंबई-वडोदरा महामार्गाच्या अलाईनमेंटशी सुसंगत रेल्वेची अलाईनमेंट घेतली जात आहे. तर मुरबाड शहरात रेल्वेचे शेवटचे टोक असल्यामुळे रेल्वे साईडींगसाठी जागेच्या आवश्यकतेनुसार अलाईनमेंट करण्यात आलेली आहे. कल्याण-मुरबाड रेल्वेच्या निश्चित केलेल्या मार्गाबाबत जाणून घेण्याबरोबरच या मार्गाच्या भौगोलिक स्थितीबद्दल अधिक माहिती असलेल्या शेतकरी वा ग्रामस्थांनी थेट उपविभागीय अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधावा. तसेच त्यांच्याकडून शंकेचे निरसन करून घ्यावे. तसेच आवश्यक सूचना कराव्यात. शेतकऱ्यांनी चुकीची माहिती व अफवांना बळी पडू नये, असे आवाहन  पाटील यांनी  केले.