ठेवीदारांनो घाबरून जाऊ नका, कोणालाही वा-यावर सोडणार नाही : आनंदराव अडसूळ यांची ग्वाही

Santosh Gaikwad November 25, 2023 05:46 PM


मुंबई, दि. २५ : अभ्युदय बँकेवर रिझर्व्ह बँकेने प्रशासक नेमल्याने भाग भांडवल सुरक्षित राहणार आहेत. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नका एकाही ठेवीदाराला वा-यावर सोडले जाणार नाही. अशी ग्वाही वजा आवाहन मुंबई को ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. 


रिझर्व्ह बँकेने अभ्युदय सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ वर्षभरासाठी बरखास्त केले. तसेच उच्च दर्जाच्या प्रशासकाची वर्षभरासाठी नेमणूक केल्याने ठेवीदारां मध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर  अडसूळ यांनी यावर पत्रकार परिषद घेतली. अडसूळ म्हणाले की, आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी बँकांवर रिझर्व्ह बॅंकेने प्रशासक मंडळ नेमून बॅंका सुरक्षित केल्या आहेत. अभ्युदय बॅंक देखील प्रशासकाच्या अख्यारित आणली आहे.  कोणतेही निर्बंध न लादता आर्थिक व्यवहार नियमित सुरू आहेत. या मंडळाच्या नेमणूकीमुळे बॅंकेच्या आर्थिक स्थैर्यास कोणतीही बाधा पोहचणार नाही. त्यामुळे बॅंकेतील भाग भांडवलदार, सभासद, सर्वसामान्य खातेदार, ठेवीदारांनी घाबरून जाऊ नका, असे आवाहन अडसूळ यांनी केले.


कोरोना महामारीमुळे या बॅंकेचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला. राज्य व केंद्र शासनाकडून मदत मिळत नसताना ही, या बँकांनी सावरण्यासाठी कंबर कसली आहे. 31 मार्च 2023 पर्यंत 193 कोटींचा तोटा सोसावा लागला. बॅंकेचे सध्याचे भाग भांडवल 216 कोटी इतके आहे. एकूण ठेवी 10 हजार कोटी, कर्ज जवळपास 6300 कोटी, 13 हजार कोटींचे खेळते भांडवल आहे. साधारणपणे 2800 कर्मचारी, अधिकारी बॅंकेत कार्यरत असल्याचे अडसूळ यांनी सांगितले.


 भारतात जवळपास १५४० सहकारी बॅंकांमध्ये अभ्युदय बॅंकेचा चौथा क्रमांक लागतो. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यात १०९ शाखा कार्यरत आहेत. अभ्युदय बॅंकेत गेल्या ४० वर्षांपासून आमची संघटना कार्यरत असून एका ही बॅंक कर्मचारी, अधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असेही  अडसूळ म्हणाले.