मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड यांची मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट !

Santosh Gaikwad June 15, 2023 08:32 PM


मुंबई : मुंबई काँग्रेस च्या इतिहासातील पहिली महिला अध्यक्ष आमदार वर्षाताई गायकवाड यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी  मुंबई मराठी पत्रकार संघाला सदिच्छा भेट दिली असता, पत्रकार संघाचे अध्यक्ष  नरेंद्र वि. वाबळे यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. 

प्रसारमाध्यमे हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे. म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघात माझा सत्कार व्हावा हे मी माझे भाग्य समजते. असे सत्काराला उत्तर देताना आमदार वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.

वर्षाताई पुढे म्हणाल्या की, एकीकडे काँग्रेस च्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण होत असताना, दुसरीकडे  राज्यात मंत्रिमंडळात एकही महिला नाही. शासकीय वसतिगृहात मुलींवरील, अत्याचार, मीरा रोडमधील घटना घडली. मात्र इतकं संवेदनहिन सरकार कधीही पाहिलेलं नाही अशी टीका त्यांची शिंदे फडणवीस सरकारवर केली. कालच लोकलमध्ये विद्यार्थीनीवर अत्याचारची  घटना घडली. सकाळी सात वाजता हि घटना घडल्याने  मुंबईला गालबोट लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.  त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मी निषेध करते. येणाऱ्या काळात महिलांच्या सुरक्षेवर अधिक भर देऊन काँग्रेसकडून विविध कार्यक्रम राबविणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.