येत्या काही तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता : हवामान खात्याचा अंदाज

Santosh Gaikwad June 12, 2023 02:50 PM


मुंबई : केरळनंतर आता मान्सूनचे   महाराष्ट्रात आगमन झाले आहे. येत्या काही तासांत महाराष्ट्रातील  कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने  वर्तवली आहे.  आज हवामान विभागाकडून महाराष्ट्रात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.


प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबईमध्ये  आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्येही १३ ते १५ जून या कालावधीत हलक्या सरींचाच अंदाज आहे. यावर्षी महाराष्ट्रात मान्सून 4 ते 5 दिवस उशिरानं दाखल झाला आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल होताच, हवामान विभागाने येत्या तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे, IMD ने याबाबत माहिती दिली आहे.