आनंदाची बातमी : अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, राज्यात आठवडाभरात ....

Santosh Gaikwad June 08, 2023 03:26 PM


मुंबई :  पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्नाl आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सून केरळ मध्ये दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली. मान्सूनला बिपोरजॉय या चक्रीवादळाने रोखून धरले होते. त्यामुळे मान्सून केरळमध्ये आठ दिवस उशिराने दाखल झाला आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ के.एस.होसलीकर यांनी दिली. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली. मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होतोय याची सर्वजण वाट पाहत आहेत.


अरबी समुद्रात खोलवर घोंघावत असलेले ‘बिपरजॉय‘ चक्रीवादळ महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागांत धडकणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने जात आहे. यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीला धोका नाही. चक्री वादळामुळे केरळमध्ये १ जून रोजी येणारा मान्सून यामुळे ८ जून रोजी झाला. मान्सून केरळमध्ये आठ दिवस उशिराने दाखल झाला आहे.मान्सूनच्या आगमनामुळे देशभरातील जनतेसोबतच शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. 


हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 'नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळच्या अनेक भागांमध्ये आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली. दरवर्षी मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचे आगमन होण्यासाठी तब्बल एक आठड्याचा कालावधी लागला. मान्सूनने केरळमध्ये  दाखल होण्यासाठी ८ जूनची तारीख गाठली. आता हळूहळू मान्सून पुढे सरकरत सक्रीय होईल. 


केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत त्याचा प्रवास महाराष्ट्राकडे होता. यामुळे ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये आला तर राज्यात सुमारे १५ जूनच्या आसपास पाऊस दाखल होण्याची चिन्हे आहेत. पण, त्याबाबत हवामानशास्त्र विभागाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.