मोदी सरकारचा निर्णय : ७५ लाख मोफत गॅस कनेक्शन

Santosh Gaikwad September 13, 2023 08:02 PM



नवी दिल्ली : केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त महिलांना मोठी भेट दिली होती. एलपीजी गॅस सिलेंडरच्या  किंमतीत सरसकट २०० रुपयांची सवलत दिली. तर उज्ज्वला योजनेतर्गंत ४०० रुपयांची सवलत देण्यात आली. केंद्र सरकारने आता देशातील ७५ लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर केंद्र सरकारने ही आनंदवार्ता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. याविषयीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. पुढील तीन आर्थिक वर्षांत गॅस सिलेंडरची जोडणी करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत या महिलांना लाभ मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी या घडामोडींची माहिती दिली. त्यानुसार जगभरातील संस्थांनी केंद्रांच्या उज्ज्वला योजनेचे कौतुक केल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे महिलांच्या आयुष्यात मोठा बदल आल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेतंर्गत आतापर्यंत 9.60 कोटी गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तीन वर्षांत 75 लाख कनेक्शन देण्यात येणार आहेत. देशातील गरीब कुटुंबांना याचा फायदा होईल. यापूर्वी केंद्र सरकारने 9.60 कोटी गॅस कनेक्शन दिले आहेत. पहिले रिफिल आणि शेगडी पण मोफत देण्यात येते. त्यासाठीचा खर्च ऑईल कंपन्या करतात. कॅबिनेटने यासोबतच ई-कोर्टस प्रोजेक्टच्या तिसऱ्या टप्प्याला पण मंजुरी दिली आहे. त्यासाठी 7210 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे.