उध्दव ठाकरे तुम्हीच खरे गद्दार : कल्याणच्या सभेत फडणवीसांचा हल्लाबोल !

Santosh Gaikwad June 19, 2023 09:32 PM


कल्याण : भाजपा-शिवसेना युतीने निवडणुकीत एकत्र मते मागितली. पण उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी नियत बदलून भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून विचारांची गद्दारी केली. खरे गद्दार तुम्हीच आहात, असा घणाघाती हल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कल्याणात केला.  महाविकास आघाडीचे अडीच वर्षे म्हणजे कुंभकर्णाची अडीच वर्ष होती, अशी टीका  फडणवीस यांनी केली. 


मोदी@९ अंतर्गत भाजपाच्या वतीने कल्याण पश्चिम येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी.  रवी, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मोदी@९ चे प्रदेश संयोजक-आमदार प्रविण दरेकर यांच्यासह भाजपाचे आमदार व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

 

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे आज दोन कार्यक्रम आहेत. ज्यांनी शिवसेना वाचविली त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा, तर ज्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार बुडविले, त्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दुसरा कार्यक्रम होत आहे. भाजपा-शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढविली. हिंदुत्व व युती सरकारसाठी मतदारांना आवाहन केले. पण खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनीच केली. खरे गद्दार तुम्हीच आहात. तुम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 


मराठा साम्राज्यात मुघल सरदारांना संताजी-धनाजी दिसत होते. तसे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह दिसत आहेत, अशी टीकाही  फडणवीस यांनी केली. उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण म्हणजे `ओकारी' होते. असा शब्द वापरणे चुकीचे आहे. पण मला हा शब्द वापरण्यासाठी मजबूर व्हावे लागत आहे. त्यांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह दिसत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली जाते. तर उद्धव ठाकरे वरळीतही शिवसैनिकांना भेटण्यासाठी जात नाहीत, असा टोलाही  फडणवीस यांनी लगावला.


केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड तालुक्याचे भाग्यविधाते शांतारामभाऊ घोलप आहेत. नियोजित मुरबाड रेल्वे स्थानकाला शांतारामभाऊ घोलप यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली. त्याचबरोबर भातसा धरणातील पाणी सिंचनासाठी व धरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना २५ कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम देण्याची मागणीही  कपिल  पाटील यांनी केली.

या वेळी राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, रविंद्र चव्हाण यांचीही भाषणे झाली. तर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. या वेळी काही कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.