कर्जत जामखेड एमआयडीसीसाठी रोहित पवार यांचे भरपावसात आंदोलन !

Santosh Gaikwad July 24, 2023 06:36 PM


मुंबई : कर्जत जामखेड येथील एमआयडीसीला मंजूरी रोखल्याच्या निषेधार्थ कर्जत जामखेड मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  रोहीत पवार यांनी  आंदोलन केले.  विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ भरपावसात आंदोलनला बसले होते. यावेळी आमदार धीरज देशमुख यांचीही उपस्थिती होती. यावेळी उद्योग मंत्री यांनी थेट आंदोलन स्थळ गाठून आमदार रोहीत पवार यांची भेट घेत त्यांची समजूत काढली. यावेळी आमदार रोहीत पवारांनी आपले आंदोलन मागे घेतले.


कर्जत जामखेड एमआयडीसी च्या प्रश्न संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सकाळीच विधिमंडात आंदोलन केले. विधिमंडळातील छत्रपती शिवजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हातात फलक घेत त्यांनी एमआयडीसीच्या मागणीसाठी सरकारचा निषेध केला. या एमआयडीसीला मंजूरी मिळावी म्हणून आमदार रोहित पवार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. 


कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा म्हणून आमदार रोहीत पवार यांनी विधानसभा प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भरपावसात आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनाची दखल घेत उद्योगमंत्री यांनी यासंदर्भात तत्काळ बैठक बोलवून अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र शब्दांवर विश्वास ठेऊन आंदोलन मागे घेतोय शब्द फिरवला तर आमरण उपोषण केले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.


रोहित पवार म्हणाले की कर्जत जामखेड मध्ये रोजगाराच्या अडचणी सुटव्यात म्हणून एमआयडीसी आवश्यक आहे यानिमित्त या विभागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे त्यामुळेच मी आंदोलन करत होतो. गेल्या वर्षभरात अनेकवेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना भेटून अधिसूचना काढावी यासाठी विनंती करत होतो. मात्र राज्य सरकारकडून कुठलेही ठोस पाऊले उचलण्यात येत नव्हते. त्यामुळे अधिवेशनादरम्यान आज आंदोलन करण्याकरिता बसलो होतो. 


आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे एमआयडीसीसाठी कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्याला मध्यवर्ती ठरणारी कर्जत तालुक्यातील पाटेगाव व खंडाळा येथील जागेची निवड करण्यात आली होती. पाटेगाव व खंडाळा येथील क्षेत्राची सहमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भूनिवड समितीने १८ नोव्हेंबर २०२१  रोजी पाहणी केली होती. त्यानंतर या क्षेत्राचे ड्रोन सर्वेक्षण जानेवारी २०२२ मध्ये करण्यात आले. १४ जुलै २०२२ रोजी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत पाटेगाव व खंडाळा तालुका कर्जत येथील ४५८.७२ हेक्टर क्षेत्राला तत्वत मान्यता देण्यात आली. मात्र पुढे याची अधिसूचना निघाली नाही. त्यासाठी आमदार पवार यांनी हिवाळी अधिवेशनात २३ डिसेंबर २०२२ रोजी लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे याकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे याला सरकारने तत्वत मान्यता देण्यात आल्याची बाब मान्य केली होती. त्यानंतरही पवार यांनी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.