सपाचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा

Santosh Gaikwad April 20, 2024 05:07 PM


मुंबई :  समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केला आहे. पक्षातील अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून  हा राजीनामा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यानंतर शेकडो महिला कार्यकर्त्या रईस शेख यांच्या कार्यालयाबाहेर समर्थनार्थ एकत्र झाल्याचे दिसून आले. परंतु रईस शेख हे दुसऱ्या पक्षाची वाट धरणार असल्याची चर्चा देखील रंगली असून त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भिवंडीच्या राजकारणात नवी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 



 रईस शेख हे सपाचे भिंवडीचे आमदार आहेत. पक्षातल्या अंतर्गत कलहामुळं दिला राजीनामा असल्याचं राईस शेख यांनी माध्यमांशी  संवाद साधताना सांगितलं आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर रईस शेख हे लवकरच अजित पवार गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र त्यांनी अद्याप पुढे ते कोणती भूमिका घेतील हे जाहीर केलेलं नाही. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याने अखिलेश यादव यांच्यासाह महाविकास आघाडीलाही मोठा धक्का बसला आहे.