आमदार अपात्रतेच्या कार्यवाहीला वेग, १४ सप्टेंबरपासून होणार सुनावणी

Santosh Gaikwad September 09, 2023 06:07 PM


मुंबई, दि. 9 : शिवसेनेच्या आमदारांवरील अपात्रतेच्या कार्यवाहीला वेग आला असून येत्या 14 तारखेपासून सुनावणी सुरू होणार आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी आमदारांना यावेळी युक्तीवाद करण्याची संधी दिली जाईल. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह विधिमंडळाच्या सचिवांसमोर सुनावणी होईल. गणेशोत्सव काळात सुनावणी घेण्यात येणार असल्याने राजकीय घडामोडी यामुळे वाढल्या आहेत.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षात उभी फूट पडली. महाविकास आघाडीचे सरकार यामुळे कोसळले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजिनामा द्यावा लागला होता. राज्यात त्यानंतर सत्तासंघर्ष सुरू झाला. शिवसेनेने (ठाकरे) न्यायालयात धाव घेत, बंडखोरांना अपात्र ठरवावे, अशी याचिकेतून मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचा गटनेता आणि प्रतोद नियुक्त्या रद्द ठरवल्या. तर अपात्रतेच्या कारवाईचे प्रकरण विधिमंडळाचे अधिकार कायम ठेवत, विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले होते.

 

शिवसेना शिंदे गटाचे 40 आणि शिवसेनेच्या (ठाकरे) 14 आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात अध्यक्षांनी सरसकट नोटीस बजावली होती. शिवसेनेने (ठाकरे) पावसाळी अधिवेशनात पक्षाची घटना, कार्यपद्धतीवर आधारित उत्तरांची कागदपत्रे सादर केली होती. तर शिंदे गटाने दोन आठवड्यांचा वेळ मागवून घेतला होता. शिवसेनेने (ठाकरे) अध्यक्षांच्या भूमिकेवर हरकत घेत, पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर अखेर सहा हजार पानांचे लेखी उत्तर शिंदे गटाने विधिमंडळाला सादर केले होते. आता येत्या 14 सप्टेंबर पासून अपात्रतेच्या कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. अध्यक्ष यावेळी कोणता निर्णय घेतात, याकडे देशवासियांचे लक्ष लागले आहे.