मंत्रीपदाची हुलकावणी, आमदार गोगावलेंनी सांगितला पडद्यामागील किस्सा ......

Santosh Gaikwad August 17, 2023 05:35 PM


रायगड : राज्यात शिंदे सरकार स्थापन होऊन वर्षाचा कालावधी उलटला. राष्ट्रवादीचा अजित पवार गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सत्तेचा वाटेकरी बनल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या  आमदारांच्या पदरी निराशाच आली. त्यातच आता महाडचे शिंदे गटातील नाराज आमदार भरत गेागावले यांनी एका कार्यक्रमात मंत्रीपदाने कशी हुलकावणी दिली त्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्ताराचा पडद्यामागील किस्सा सांगितला. 


अलिबाग येथील पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात आमदार गोगावले यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. आपल्याला मंत्रीपद न मिळण्याचा मजेदार किस्सा त्यांनी सांगितला.  गोगावले म्हणाले, पहिल्या नऊ जणांच्या यादीत मला मंत्रीपद मिळणार होते पण आमच्यातल्या एका सहकारी आमदाराने सांगितले की मला मंत्रीपद दिले नाही तर माझी बायको आत्महत्या करेल.. एकजण म्हणाला नारायण राणे मला जगू देणार नाही, माझं राजकारण संपवतील...तिसरा म्हणाला मला मंत्रीपद मिळाले नाही तर मी राजीनामा देईन...या सगळयांनी मुख्यमंत्री शिंदेंना अडचणीत आणले. संभाजीनगरमध्ये पाच पैकी दोघांना मंत्रीपद दिली आहेत तुला काय घाई आहे असे सांगून मी एकाला थांबवले आम्ही थांबलो ते अजूनपर्यंत थांबलोच आहे असा किस्सा  गोगावलेंनी आपल्या विनोदी शैलीत  सांगितला.  



राष्ट्रवादीचे अजित पवार गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सत्तेचे वाटेकरी वाढले. एकिकडे शिंदे गटातील आमदार मंत्री पदाची आस लावून बसलेले असतानाच दुसरीकडे अजित पवारांसह ८ मंत्रयांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता वाढत असून त्यांची नाराजी अजूनही लपून राहिलेली नाही.  सुरत-गुवाहाटी-मुंबई असा प्रवास शिंदे गटातील आमदारांनी केला होता. त्यावेळी आमदार गोगावले यांनी महत्वाची भूमिका पार पाडत होती. एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून भरत गोगावले यांची ओळख आहे. शिंदेंच्या मंत्रिमंडळात त्यांनाच पहिल्याच खेपेला संधी मिळेल, अशी शक्यता होती. पण आयत्यावेळी त्यांना थांबावे लागले. अगदी गेल्या वर्षभरापासून कपडे शिवून तयार आहेत, कोट रेडी आहे फक्त फोनची वाट बघतो आहे, असे अधीरपणे ते सांगत राहिले. पण आता अजितदादांच्या एन्ट्रीने त्यांची मंत्रिपदासाठीची वेटिंग आणखीनच लांबली आहे.