शपथविधी झाला, पण खातेवाटप कधी ?

Santosh Gaikwad July 10, 2023 10:12 PM


मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत पुन्हा एकदा वर्षभरापूर्वीचा पहाटेचा शपथविधी खरा केला. राष्ट्रवादीमधील एक गट शिंदे फडणवीस सरकारला सामील झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेती. मंत्रीपदाची शपथ घेऊन जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी लोटला आहे. तरी देखील अजूनही मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार खातेवाटप होईल असे सांगत आहेत मात्र निश्चित वेळ तारीख सांगितली जात नाही. त्यामुळे आमदारांमध्ये आणि नव्या मंत्रयांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. 


 गेल्या वर्षी जे काही शिवसेनेसोबत झाले, अगदी तसेच आता राष्ट्रवादीसोबत होताना दिसून येत आहे. पण या सर्व राजकीय उलथापालथमुळे शिंदे यांच्या गटातील आमदार मात्र चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी याबाबत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. पण त्यांची स्थिती सहनही होईना आणि सांगताही येईना अशी झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार एका दिवसात आले आणि मंत्री झाल्याने शिंदे गटाच नाराजी आहे. गेल्या वर्षभरापासून मंत्रीपद मिळणार या आशेने शिंदे गटातील आमदार बसले आहेत. त्यांच्या आशेवर पाणी फेरल्याने त्यांची नाराजी आहे. मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतरही खातेवाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे  राष्ट्रवादीतील नव्याने झालेले मंत्री हे बिनखात्याचे मंत्री बनलेले आहेत.  


आठ आमदारांच्या शपथविधीनंतर आता शिंदेंच्या आमदारांमध्ये मंत्रीपदावरून आणि पालकमंत्र्यावरून रस्सीखेच सुरू असल्याच पाहायला मिळत आहे. त्यातही अर्थखात्यावरून शीतयुद्ध होण्याची देखील शक्यता आहे. मविआचे सरकार असताना अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते. त्यामुळे आता देखील पवार हे अर्थखात्यासाठी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. पण दुसरीकडे मात्र अजित पवारांकडे अर्थखाते जाता कामा नये, असा अट्टहास शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. पण पक्षाच्याविरोधात जाऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या मर्जीतील आमदारांना महत्त्वाची खाती मिळावी, यासाठी ते स्वतः आग्रही असल्याचे समजते. 


पहाटेच्या शपथविधीनंतर दुपारचा शपथ विधी झाला आणि पुन्हा एकदा राजकीय भूंकप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी तीन वर्षात तीन वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सोबत 8 आमदारही मंत्री झाले. या खळबळजनक शपथविधीनंतर आता राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाला आहे. भाजपा शिवसेना यांचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याआधीच राष्ट्रवादीचा शपथ विधी झाल्याने त्यांना कोणती खाती दिली जाणार? कोणत्या मंत्र्यांची खाती काढून त्यांना दिली जाणार? उर्वरित आमदारांचा शपथ विधी कधी होईल ? याची सर्वत्र चर्चा आहे,  यामुळे बऱ्याच जणांना आता राज्यमंत्री आणि महामंडळ अध्यक्ष पदावरच समाधान मानावं लागेल असच दिसतंय.

-----