विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय.., म्हणून बाहेर पडलो - छगन भुजबळ

Santosh Gaikwad July 05, 2023 05:33 PM

मुंबई  :- शरदचंद्र पवार साहेब हे आमचे विठ्ठल आहे. मात्र आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरा घातला आहे. त्या बडव्यांमुळे आज आम्ही बाहेर पडलो. आम्ही भाजपात गेलेलो नाही. राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आणि कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांच्या आग्रहामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी म्हणूनच सत्तेत सहभागी झालो. साहेब तुम्ही आवाज द्या, या बडव्याना बाजूला करा, आपण सत्तेत राहून जनेतेचे प्रश्न सोडवू. ज्याप्रमाणे नागालँड मध्ये परवानगी दिली तशी आम्हाला द्या, पोटाशी धरा असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केले.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा मेळावा मुंबईतील एमईटी भुजबळ नॉलेज सिटीच्या प्रांगणात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, मंत्री धर्मराव बाबा आत्राम, मंत्री अनिल पाटील,  मंत्री संजय बनसोडे, मंत्री अदितीताई तटकरे, माजी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, शिवाजीराव गर्जे, संजय बोरगे यांच्यासह आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


छगन भुजबळ पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आमदारांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या साथीने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्री पदाची शपथ घेतली. याबाबत सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला असेल, मात्र लवकरच या गोष्टींचा उलगडला होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ४० पेक्षा जास्त आमदार आपल्या सोबत आहे. आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काम कसं करू शकतो, कायदे आम्हालाही कळतात. याचा सर्व विचार करून पुढच पाऊल आपण उचललं आहे. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नव्या दमाने वाटचाल करेल असे त्यांनी सांगितले.  अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्व समाजाला सोबत घेऊन काम केलं जाईल. आज सुनील तटकरे यांच्या सारख्या ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली यापुढील काळात सर्व समाजाला सोबत घेऊन संधी दिली जाईल असे त्यांनी सांगितले. 


ते म्हणाले की, सत्ता आल्यानंतर लगेच प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मात्र आत्ताचे प्रांतअध्यक्ष पाच वर्षाहून अधिक काळ बदलला जात नाही. खालचे पदाधिकारी बदलले जातात.   प्रदेशाध्यक्ष मात्र त्या जागेवर राहिले. एकीकडे भाकरी फिरविण्याची भाषा केली जाते. मात्र रोटला जर जागेवर असेल तर कसं होईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला.


भुजबळ म्हणाले की, सन २०१४ च्या अगोदर एकत्र निवडणुका लढवीत असतांना सन २०१४ ला आपण मित्र पक्षांची साथ का सोडली ? सन २०१९ साली सकाळचा शपथविधी का झाला ? गुगली टाकून आपल्याच गड्याचे खच्चीकरण का ? असे सवाल उपस्थित केले.  एकीकडे दिल्लीत चर्चा करायची. काही निर्णय घ्यायचे आणि ते निर्णय पुन्हा निर्णय मागे घेतला जातो त्यामुळे नेते तोंडघाशी पडले याचा विचार मात्र केला जात नाही असेही भुजबळ यांनी सांगितले.