निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी आरक्षण : विरोधी पक्षनेत्याचे सरकारवर टीकास्र*

Santosh Gaikwad February 20, 2024 05:12 PM



मुंबई दि. 20 :- महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण दिले. हे आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. त्यामुळे  फसव्या सरकारने मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली असल्याची प्रतिक्रीया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून आज सभागृहात विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिले नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

 वडेट्टीवार म्हणाले की, सरकारने कितीही ढोल वाजवले, उर बडवले तरी आंदोलनकर्त्यांमध्ये सरकारने फसवल्याची भावना आहे. हे या सरकारचे अपयश आहे.  महायुतीचे सरकार हे फसवे सरकार आहे. हे मराठा समाजाच्या आता लक्षात आले आहे. दोन वेळा न्यायालयात न टिकलेले आरक्षण पुन्हा या महायुती सरकारने दिले आहे. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे. तेलही नाही आणि तुपही नाही आमच्या मराठा समाज बांधवांच्या हाती या महायुती सरकारने फक्त धुपाटणे दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारने ही नौटंकी केली आहे.

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची आणि माझी भूमीका मी वेळोवेळी मांडली आहे. आज दिलेले 10 टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले आहे. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. या महायुती सरकारमुळे मराठा समाजाचा पुन्हा भ्रमनिरास होणार असल्याचे   वडेट्टीवार यांनी आज स्पष्ट केले.


महायुतीचे  सरकार बळीराजाची फसगत करणारं फसवं सरकार आहे. बेरोजगार युवक-युवतींची फसगत करणारं फसवं सरकार आहे. परीक्षार्थी उमेदवारांची फसगत करणारं फसवं सरकार आहे. जुमलेबाजी करणारं जुमलेबाज सरकार आहे. मलिदा खाणारं फसवं सरकार आहे. गॅरेंटीच्या नावाखाली फसगत करणार नो गॅरेंटी सरकार आहे. आता आरक्षण प्रश्नी फसगत करणारं फसवं सरकार म्हणून नवी ओळख या सरकारला मिळाली आहे. अशा शब्दात  वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला आहे.