मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच : राज ठाकरे

Santosh Gaikwad November 16, 2023 07:50 PM

 

ठाणे :  जातीयवाद निर्माण करून महाराष्ट्राची शांतता भंग केली जात आहे. निवडणूकीच्या तोंडावर हे सर्व प्रकार सुरू होत आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच, असे सुचक विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी ठाण्यात केले. तसेच राज्यातील राजकीय परिस्थिती संभ्रमावस्थेतील आणि घाणेरडी असल्याचेही ते म्हणाले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गुरुवारी ठाणे येथे कार्यकर्त्यांची बैठक घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  राज्यातील राजकीय परिस्थिती संभ्रमावस्थेतील आणि घाणेरडी झालेली आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना मतदारांची भिती वाटायला हवी. परंतु राजकीय पक्ष उघडपणे मतदारांना मुर्ख समजतात. पाच वर्ष खड्डे, बेरोजगारी या विषयावर बोलायचे आणि शेवटी मतदान करताना वेगळ्याच मुद्द्यावर मतदान करायचे असे मतदारांनी केल्यास त्यांची किमंत काय राहणार, मतदार नुसता सुशिक्षित असून नाही तर सूज्ञ असावा लागतो, असेही ते म्हणाले.  


*अमित शाहांवर टीका*  


फटाके कधी लावायचे, सण कसे साजरे करायचे हे न्यायालय ठरविते. परंतु आदेशाचे पालन होते का याकडे न्यायालयाकडून लक्ष दिले जात नाही. मराठी पाट्यांच्या विरोधात येथील व्यापारी न्यायालयात जातात.  सर्वोच्च न्यायालयाने मराठी भाषेत पाट्या असाव्यात असा आदेश दिल्यानंतरही सरकारकडून त्यासंदर्भाची अमलबजावणी  होत नाही. त्यामुळे आता आम्हालाच आता काहीतर करावे लागेल असेही ते म्हणाले.  राम मंदिर दर्शानाचे नागरिकांना अमीष दाखविण्याऐवजी तुम्ही काय कामे केली ती जनतेसमोर दाखवा, अशी टिका त्यांनी अमित शाह यांच्यावर केली. वाजपेयी यांच्या काळातील भाजप वेगळी होती. आताची भाजपची खूप वेगळी आहे. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. धाडी जास्त काळ टिकणाऱ्या नसतात. त्या उलटून अंगावर येऊ शकतात, अशी टिका त्यांनी भाजपवर केली.


*आंदोलनामागे कोण आहे?, हे राज ठाकरेंनीच शोधून काढावं : जरांगे* 


 माझ्या आंदोलनामागे कोण आहे?, हे राज ठाकरेंनीच शोधून काढावं, असं प्रत्युत्तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे  यांनी राज ठाकरे यांना दिलं आहे.  माझ्या आंदोलनामागे कोण आहे? हे राज ठाकरेंनीच शोधून काढावं आणि मलादेखील सांगावं. या आंदोलनामागे कोणाचाीह हात नसून हr मराठा समाजाची साथ आहे. त्यासोबतच मराठ्याची लेकरं मोठे व्हायला लागले. त्यांचं कल्याण व्हायला लागलं की, अशी वक्तव्य करायला सुरुवात होते. आमच्यावर खोटे आरोपदेखील केले जातात. मात्र मराठा समाज आता कोणाचंही ऐकणार नाही.  त्यासोबतच मराठआ समाजाला स्पष्ट माहित झालं आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि सगळे मराठा मिळून आम्ही आरक्षण मिळवणारच आहोत, असं जरांगे म्हणाले.