आमची वाहने अडविल्यास फडणवीसांच्या दारात बसू : मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

Santosh Gaikwad December 29, 2023 05:46 PM



मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. आज जरांगेंचे शिष्टमंडळ मैदानाची पाहणी करण्यासाठी मुंबईत पोहचले आहे. २० तारखेला मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत येणार असून, जर सरकारने आमची वाहने अडवली तर आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसू असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 


आमची वाहने अडवली तर आम्ही आमचे सामान कशात नेणार. आम्हाला मुंबईत राहण्यासाठी निवारा, दैनंदिन जीवनाच्या गोष्टी लागणार आहेत त्यासाठी आम्ही ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन मुंबईत येणार आहोत. आम्ही त्यात दगड भरुन आणणार नाही. त्यामुळे सरकार आपल्यावर कारवाई करेल. आपली वाहने जप्त करेल याविषयी मराठ्यांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.


मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक येतील, असा विश्वास मनोज जरांगेंनी व्यक्त केला. मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही. २० जानेवारीपर्यंत मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईला येणार असून मुंबईतील सर्व मैदाने आम्हाला लागणार आहेत. त्यामुळे आता सरकारची जबाबदारी आहेत त्यांनी आम्हाला मैदाने द्यावीत अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. जर आंदोलनासाठी परवानगी मिळाली नाही तर मुंबईतच आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच यावेळी जरांगे यांनी राज्यातील सर्व मराठा समाजाला आंदोलनस्थळी येत मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.