मनोज जरांगेंकडून आमरण उपोषण मागे

Santosh Gaikwad February 26, 2024 04:49 PM


जालना : मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.  मी आता अंतरवालीतच साखळी उपोषण करणार आहे. एक दोन दिवस उपचार घेऊन मी आता मराठा समाजाच्या भेटीला गावागावात येणार आहे. आता तुम्ही आणि आपण एकविचाराने पुढची दिशा ठरवणार आहोत असे जरांगे यांनी म्हटलं आहे. 


मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली होती. आज त्यांच्या उपोषणाचा सतरावा दिवस होता. सरकारने काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करावी यासाठी ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. मात्र, सरकारने अद्याप काही निर्णय न घेताच त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. येत्या काळात ते आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.  

 

मनोज जरांगे पाटील हे रविवारी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सलाईनमधून विष देऊन मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. फडणवीसांना मला मारायचं आहे. त्यामुळे मी सागर बंगल्यावर येतो. त्यांनी मला मारुन दाखवावं असं म्हणत ते मुंबईकडे कुणालाही न जुमानता निघाले होते. अंबडमध्ये रात्री १ वाजता संचारबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे लोकांच्या संचारावर निर्बंध आले. त्यानंतर आज सकाळी छ. संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले होते. अखेर जरांगे पाटील यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आणि फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे जाण्याचं टाळलं. त्यानंतर ते अंतरवली सराटी गावामध्ये परत आले होते.


मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी आणि खालच्या भाषेत टीका केल्यानंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. यापूर्वी पोलिसांकडून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु, सोमवारी पहिल्यांदाच पोलिसांकडून थेट मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य सरकारकडून जवळपास 1041 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समजतयं.