को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन बुध्दिबळ स्पर्धेत मानस सावंत विजेता

Santosh Gaikwad February 06, 2024 04:42 PM


 मुंबई :  को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या ६४ व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या आंतर सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या बुध्दिबळ स्पर्धेत म्युनिसिपल बँकेच्या मानस सावंतने विजेतेपद पटकाविले. मानसने इन्कमटॅक्स को-ऑपरेटीव्ह बँकेच्या साईराज घाडीगावकरच्या राजाला ३९ चालीत नमवून प्रथम स्थानावर झेप घेतली. साईराज घाडीगावकरने द्वितीय, एनकेजीएसबी बँकेच्या विनोद मोरेने तृतीय आणि म्युनिसिपल बँकेच्या दिप शिलींगकरने चतुर्थ क्रमांक मिळविला. को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ व महाराष्ट्र मंत्रालय को-ऑप. बँकेचे अध्यक्ष प्रमोद पंडित यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ दादर-पश्चिम येथील युनियन सभागृहात संपन्न झाला. 


    महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटीव्ह बँक पुरस्कृत आंतर सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या बुध्दिबळ स्पर्धेची मानस सावंत विरुद्ध साईराज घाडीगावकर यामधील निर्णायक फेरी चुरशीची झाली. दोघांनी वजिराच्या प्याद्याने प्रारंभ करून कौशल्याची चुणूक दाखविली. आठव्या चाली अखेर दोघांनी कॅसलिंग करून राजे सुरक्षित केले. दोघांकडे डावाच्या शेवटी दोन प्यादी, वजीर व राजा शिल्लक होती. निर्णायक क्षणी मानस सावंतने आक्रमक खेळ करून प्रतिस्पर्ध्याच्या राजास जेरीस आणले आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. विनोद मोरेने हत्ती व उंटाच्या सहाय्याने विजयी चाली रचत दिप शिलींगकरच्या राजावर मात केली आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जिंकला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ, युनियनचे कार्याध्यक्ष सुनिल साळवी, सरचिटणीस नरेंद्र सावंत, खजिनदार प्रमोद पार्टे, ठाणे युनियनचे सरचिटणीस प्रदिप पाटील, सहखजिनदार जनार्दन मोरे, अन्य पदाधिकारी भार्गव धारगळकर, अमूल प्रभू, प्रकाश वाघमारे, समीर तुळसकर, अशोक नवले, प्रविण शिंदे, अमरेष ठाकूर, धर्मराज मुंढे आदी मंडळी विशेष कार्यरत होती.


**********