'सरकारी काम आणि सहा महिने थांब' हे चित्र बदलणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Santosh Gaikwad May 25, 2023 10:16 PM


रत्नागिरी   : 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' हे चित्र बदलणार असून आम्ही 24 तास काम करतोय असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   यांनी म्हटलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केलं. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत विविध शासकीय योजनेतल्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.  


“शासन आपल्या दारी” या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेच्या शुभारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी  जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह,  जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पूजार, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.


   मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात या अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. अहमदनगर जिल्हा तसेच ठाणे जिल्ह्याने सुद्धा यापासून प्रेरणा घेत या अभियानासाठी नोंदणी शिबिरे घेतली आहेत. कल्याणमध्ये दीड लाख लाभार्थींना लाभ देत आहोत. गडचिरोलीसारख्या ठिकाणी दोन महिन्यात एक लाख लाभार्थींची नोंद झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार , तालुक्यात १५ हजार आणि गावात किमान १०० लाभार्थींना योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे यादृष्टीने सर्व तयारी झाली आहे.या अभियानासाठी १६ हजार योजना दूत नेमले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे.


  प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरु 


 गेल्या 11 महिन्यात ३५ मंत्रिमंडळ बैठका आणि त्यातून ३५० निर्णय हे सर्वसामान्य माणसांच्या हिताचे घेण्यात आले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सुखी समाधानाचे दिवस यावेत, शासनाविषयी जनतेच्या मनात सकारात्मक भावना निर्माण व्हाव्यात हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत ही दोन्ही चाके विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एसटीच्या 50 टक्के सवलतीमुळे महिलांचा प्रवास वाढला आहे. एसटीने दिलेल्या सवलतीमुळे जेष्ठांच्या प्रवासात वाढ झाली आहे. एमएमआरडीए च्या धर्तीवर कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या  माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास साधण्यात येत आहे. कोकणात दहा हजार मल्टिनॅशनल कंपन्यांनी नोंदणी केली आहे.  यातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. केंद्र सरकार यासाठी मदत करत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होत आहे. मुंबई-सिंधुदुर्ग महामार्ग तयार होणार आहे, त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल असेही त्यांनी सांगितले.