शिंदे फडणवीस सरकारचा मविआला दणका, परमबीर सिंह यांचं निलंबन मागे !

Santosh Gaikwad May 12, 2023 10:20 PM

मुंबई : मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतले आहेत. यासोबतच सरकारने सिंह यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सेवेत रुजू केले आहे.   परमबीर सिंग यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

 

अँटेलिया येथील स्फोटकांचं प्रकरण आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपामुळे परमबीर सिंह हे वादात सापडले होते. सिंग यांच्या या आरोपावरून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या आरोपानंतर देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दुसरीकडे हवालाच्या आरोपामुळे देशमुख यांना वर्षभर कारागृहात राहावे लागले. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं. 


या निर्णयावर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने म्हणजेच कॅटने निर्णय दिला, त्यात त्यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात सुरू असलेली विभागीय चौकशी चुकीची असल्याचे म्हटले. त्याचवेळी त्यांचे निलंबनही चुकीचे असल्याचे सांगत, त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार राज्य सरकारने त्यांच्यावर लादलेले सर्व निर्णय आज मागे घेतले आहेत. त्यासोबतच त्यांची सेवाही पूर्ववत करण्यात आली आहे.