माधव आपटे चषक क्रिकेट स्पर्धा : होम ग्राउंड अकादमी -माधव आपटे संघात अंतिम झुंज रंगणार

Santosh Sakpal May 17, 2023 12:09 AM


मुंबई,  : होम ग्राउंड अकादमी संघाने सी.सी.आय. आयोजित पहिल्या माधव आपटे चषक १५ वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत आज सलग दुसऱ्या विजयाची नोंद करीत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या दुसऱ्या साखळी लढतीत त्यांनी साळगावकर स्पोर्ट्स क्लबवर ४३ धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आज सकाळी झालेल्या आणखी एका लढतीत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी आणि माधव आपटे संघ यांच्यातील लढत "टाय" झाली. त्यामुळे आता होम ग्राउंड अकादमी आणि माधव आपटे संघ यांच्यात उद्या बुधवारी दुपारी अंतिम झुंज रंगणार आहे. स्पर्धेतील तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी दिलीप वेंगसरकर फौंडेशन आणि यजमान सी.सी.आय. किड्स अकादमी यांच्यात होणार असून हीलढत उद्या सकाळी ९.०० वाजता तर अंतिम फेरीची लढत दुपारी १२.०० वाजता खेळविण्यात येईल.

तत्पूर्वी सकाळच्या सत्रात होम ग्राउंड अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १०७ धावांची मजल मारली. ७ बाद ५७ अशा खराब सुरुवातीनंतर युलोन मेंडोन्सा (नाबाद १५) आणि कनक जेठवा (नाबाद २४) या दोघीनी आठव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केल्यानेच त्यांना ७ बाद १०७ अशी किमान सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. मात्र या तुटपुंज्या धावसंख्येची पाठराखण करताना जान्हवी वसईकर (५ धावांत ४ बळी), आर्या उमेश (१० धावांत २ बळी) आणि शनाया झवेरी (५ धावांत २ बळी) यांनी टिच्चून गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी साळगावकर स्पोर्ट्स क्लब संघाला ६४ धावांत गुंडाळून आपल्या संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. जान्हवी वसईकर हिला सामनावीर 'किताब मिळाला आणि सी.सी.आय.च्या मेम्बरशिप डिपार्टमेंटच्या योगिता कोठकर यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार देण्यात आला.

सकाळच्या दुसऱ्या लढतीत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १०० धावा केल्या. त्यात श्रद्धा सिंगचा २२ धावांचा प्रमुख वाट होता. श्रेणी सोनी (१६/२) आणि श्रावणी पाटील (१७/२) यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. या आव्हानाचा पाठलाग करताना माधव आपटे संघाच्या मुद्रा खेडेकर (१४), आर्या वाजगे (२६), श्रावणी पाटील (नाबाद १६) आणि भावना सानप (नाबाद १५) यांनी झुंजार फलंदाजी केली ; पण निर्धारित २० षटकांत त्यांना ४ बाद १०० धावांचीच मजल मारता आली आणि अखेर ही लढत "टाय" झाली आणि उभय संघाना प्रत्येकी एक गुण मिळाला. या लढतीत श्रद्धा सिंग हे सामनावीर ठरली आणि एम.सी.ए.च्या कांता जावळे यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले.

आजच्या दुपारच्या सत्रातील शेवटच्या साखळी लढतीत दिलीप वेंगसरकर फौंडेशन संघाने यजमान सी.सी.आय. किड्स अकादमी विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ४ बाद १५९ ही या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या नोंदविली. इरा जाधव (८१) आणि मुग्धा पार्टे (४७) यांनी १७.२ षटकांतच १४७ धावांची सलामी दिली. इराने ५१ चेंडूत १५ चौकारांसह ८१ धावांची खेळी केली तर मुग्धा पार्टे हिने ७ चौकारांसह ४७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सी.सी.आय. किड्स च्या साना शेख (२०), पर्ल कोरिया (२३) आणि ध्रुवी त्रिवेदी (नाबाद ४४) यांनीच थोडाफार प्रतिकार केला. त्यांच्या अन्य फलंदाजांना स्वरा जाधवच्या (३७ धावांत ३ बळी) अचूक गोलंदाजीने निरुत्तर केले.

संक्षिप्त धावफलक - होम ग्राउंड अकादमी - २० षटकांत ७ बाद १०७ (युलोन मेंडोन्सा नाबाद १५, कनक जेठवा नाबाद २४ ) वि.वि. साळगावकर स्पोर्ट्स क्लब - १८.२ षटकांत सर्वबाद ६४ (रिया भावसार २४; आर्या उमेश १० धावांत २ बळी, शनाया झवेरी ५ धावांत २ बळी, जान्हवी वसईकर ५ धावांत ४ बळी). सामनावीर - जान्हवी वसईकर .

अचिव्हर्स क्रिकेट अकादमी - २० षटकांत ८ बाद १०० (विदिशा नाईक १९, श्रद्धा सिंग २२, प्रियदर्शिनी सिंग १०, श्रेणी सोनी १६ धावांत २ बळी, श्रावणी पाटील १७ धावांत २ बळी) "टाय" वि. माधव आपटे संघ - २० षटकांत ४ बाद १०० (मुद्रा खेडेकर १४, आर्या वाजगे २६, श्रावणी पाटील नाबाद १६, भावना सानप नाबाद १५) सामनावीर - श्रद्धा सिंग .

दिलीप वेंगसरकर फौंडेशन - २० षटकांत ४ बाद १५९ (इरा जाधव ८१, मुग्धा पार्टे ४७; अंशू पाल १७ धावांत २ बळी) वि.वि. सी.सी.आय. किड्स अकादमी - ,२० षटकांत ८ बाद ११९ (साना शेख २०, ध्रुवी त्रिवेदी नाबाद ४४, पर्ल कोरिया २३; स्वर जाधव ३७ धावांत ३ बळी). सामनावीर - इरा जाधव