राज्यात दुस-या टप्प्यात मतदानाचा टक्का घसरला

Santosh Gaikwad April 27, 2024 06:39 AM


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ८८ मतदारसंघांमध्ये  सरासरी ६४.३५ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ६९.४५ मतदान झाले होते. गेल्या वेळच्या तुलनेत या वेळी मतांची टक्केवारी पाच ने घसरली. २६ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ६४ टक्के मतदान झाले होते. दोन्ही टप्प्यांमध्ये सरासरी मतांचा टक्का एकसमान राहिल्याचे दिसते. महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांमध्ये   सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
 
 दुसऱ्या टप्प्यातही संध्याकाळी पाचवाजेपर्यंत त्रिपुरामध्ये सर्वाधिक ७७.५३ टक्के मतदान झाले. त्या खालोखाल मणिपूरमध्ये ७६.०६ टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशने ५२.७४ टक्के मतांचा नीचांक नोंदवला. पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर प्रदेशात ६१.११ टक्के मतदान झाले होते दुसऱ्या टप्प्यामध्ये बिहारमध्ये ५३.०३ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यामध्ये बिहारमध्ये सर्वात कमी ४९.२६ टक्के मतदानाची नोंद झाली होती.  

दुसऱ्या टप्प्यात केरळमधील २०, कर्नाटकातील १४, राजस्थानमधील १३, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी ८, मध्य प्रदेशातील ७, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी ५, पश्चिम बंगाल व छत्तीसगडमधील प्रत्येकी तीन जागांसाठी तर, जम्मू-काश्मीर, मणिपूर आणि त्रिपुरातील प्रत्येकी एक अशा १३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ८८ मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले.


दुसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात अंदाजे ५९.६३ टक्के मतदान

बुलढाणा -  ५८.४५ टक्के
अकोला - ५८.०९ टक्के
अमरावती - ६०.७४ टक्के
वर्धा - ६२.६५ टक्के
यवतमाळ - वाशिम - ५७.०० टक्के.
हिंगोली -  ६०.७९ टक्के
नांदेड -  ५९.५७ टक्के
परभणी - ६०.०९ टक्के