आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गडचिरोली व बुलढाणा येथे प्रसूतीदरम्यान महिलांचा मृत्यू

Santosh Gaikwad December 13, 2023 03:56 PM


*विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकावर जोरदार हल्लाबोल*



नागपूर,13:- गडचिरोली व बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान दोन महिलांचा मृत्यू झाला. याला आरोग्य खात्याचा हलगर्जीपणा कारणीभूत असून आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. आरोग्य विभागाच्या कारभाराचा निषेध करून दोषींवर कडक कारवाईची मागणी करत श्री. वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.


विधानसभेत प्रशोत्तराच्या तासादरम्यात झालेल्या चर्चेत श्री. वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाचे वाभाडे काढत जोरदार हल्लाबोल केला.


गडचिरोली शहरातील जिल्हा स्त्री व बालरूग्णालयात सिझेरियन प्रसुतीनंतर श्रीमती रजनी प्रशांत शेडमाके व श्रीमती उज्वला नरेश बुरे या दोन महिलांचा डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रुग्णालय व अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालय या दोन्ही ठिकाणी उपचारासाठी आलेल्या श्रीमती विद्या निलेश गावंडे या तरुणीचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. या प्रकरणी कडक कारवाईची मागणी . वडेट्टीवार यांनी केली आहे.

*******