कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन विरोधकांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

Santosh Gaikwad February 27, 2024 02:07 PM


मुंबई, दि. २७ः अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले. वाढती गुन्हेगारी, पोलीस ठाण्यात आमदाराने केलेला गोळीबार आणि दिवसागणिक वाढत्या गुंडगिरीच्या घटनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधकांनी आक्रमक होत विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र आंदोलन करत राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने केली.  

राज्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. पुण्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरण, दहिसरमधील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गेलेल्या गोळीबार प्रकरणाने राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचे पडसाद उमटले. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या कार्यपध्दती विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अत्याचार, बलात्कार, खुनाच्या आणि दररोज गोळीबाराच्या नवीन घटना वाढीस लागल्या आहेत. गृहविभाग, पोलीस प्रशासन कारवाई करण्यात अपयशी ठरला आहे. महायुतीच्या सरकार मध्ये गुंडाना राजाश्रय मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला.


राज्यातून 'शिवशाही गेली, गुंडशाही आली. शासन आपल्या दारी, गोळीबार घरोघरी, महाराष्ट्राचा कल्लू मामा कोण, तरूणांना दिला नाही रोजगार, त्यांच्यासाठी मांडला ड्रग्सचा बाजार, 
वर्षा निवासस्थानी गुंडाना संरक्षण आणि आश्रय देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा दिल्या. निषेधाचे हातात फलक घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक झाले. दरम्यान, हातात नकली बंदूका घेऊन विरोधकांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आदी महाविकास आघाडीचे आमदार आंदोलनात सहभागी झाले होते.