स्वदेश, स्वधर्म आणि स्वाभिमानाचा जागर करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

Santosh Gaikwad August 09, 2023 06:54 PM


‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाच्या शुभारंभ 

*ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तुजतनाच्या विविध विकास कामांचेही लोकार्पण*

  

मुंबई : भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशभक्तांनी, क्रांतिकारकांनी, समाजसुधारकांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या बलिदानामुळेच आज देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात ‘स्वदेश’, ‘स्वधर्म’ आणि ‘स्वाभिमान’ जागृत झाला आहे. ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, ‘माझा देश’, या अभियानातून आपल्याला ‘स्वदेश’, ‘स्वधर्म’ आणि ‘स्वाभिमान’ हाच मंत्र मिळाला आहे. या मंत्राचा जागर करणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे, असा संदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी दिला.  केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ गत वर्षभरात राबविण्यात आला. या महोत्सवाचा समारोप ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने होत आहे. त्यांचा मुख्य सोहळा आज (दिनांक ९ ऑगस्ट २०२३) ऑगस्ट क्रांती मैदानात संपन्न झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

 

याप्रसंगी उपमुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री   अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री  . छगन भुजबळ, वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री   सुधीर मुनगंटीवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा, आमदार  आशीष शेलार, आमदार  . सदा सरवणकर, आमदार   यामिनी जाधव, आमदार   मनीषा कायंदे यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव  मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक  . इकबाल सिंह चहल, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव   विकास खारगे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव (२) डॉ. के. एच. गोविंदराज, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)   पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (सामान्य प्रशासन)  मिलिन सावंत, उप आयुक्त (परिमंडळ १)   डॉ. (श्रीमती) संगीता हसनाळे, सहायक आयुक्त   शरद उघडे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.


मुख्यमंत्री   शिंदे म्हणाले, महात्मा गांधी यांनी याच ठिकाणाहून इंग्रजांना ‘चले जाव’ असे ठणकावून सांगितले. त्यांनी ‘करो या मरो’चा नारा देत तरुणांमध्ये चेतना जागृत केली. त्यानंतर इंग्रजांना भारतातून काढता पाय घ्यावा लागला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आयुष्य पणाले लावले. त्यांच्या बलिदानामुळेच स्वातंत्र्याचा सूर्य आज उगवला आहे. क्रांतिकारकांच्या, देशभक्तांच्या त्यागामुळेच आपण आज हा ‘अमृतक्षण’ म्हणजेच ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करतोय. या महोत्सवाचा समारोप देशभरात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या राष्ट्रव्यापी अभियानाने होत आहे. या अभियानात महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी केले. 


स्वराज्य स्वातंत्र्याचा हुंकार महाराष्ट्राच्या मातीतूनच उमटला. त्यामुळे आपण सर्वांनी त्याचा अभिमान बाळगायला हवा. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी केली. क्रांतिकारक, समाजसुधारक, कागमार, शेतकरी, आदिवासी बांधव या सगळ्यांनी देखील आपापल्यापरिने स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिले. त्यामुळे त्यांचे केवळ स्मरण करण्यापर्यंतच न थांबता त्यांची देशाप्रती असलेली एकनिष्ठा तरुणांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवी. त्यासाठी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी ही व्यापक संकल्पना हाती घेतली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात देशप्रेम रुजविण्याचे काम होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून तब्बल ७५०० कलशांमधून माती आणून दिल्ली येथे अमृत वाटिका साकारण्यात येणार आहे. 'हर घर तिरंगा' या अभियानाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर होता. 'इंडिया @७५' या उपक्रमात १०,६४,४१० कार्यक्रम संपन्न झाले. अगदी त्याचप्रमाणे ‘माझी माती माझा देश’ या अभियातही आपण अग्रेसर रहायचे आहे. ग्रामपंचायत ते शहर स्तरापर्यंत याची व्यापक अंमलबजावणी होणार आहे. यातही आपला महाराष्ट्र अव्वल राहील, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री  शिंदे यांनी व्यक्त केला.


 *विकसित भारताची संकल्पना नव्या पिढीमध्ये रुजविणे गरजेचे - देवेंद्र फडणवीस*


प्रधानमंत्री . नरेंद्र मोदी यांना देशातील गुलामगिरीच्या खुणा संपवायच्या आहेत. आपली संस्कृती आणि परंपरा जपताना बुरसटलेल्या आणि कालबाह्य संकल्पना खोडून काढत आदर्श आणि विकसित भारताची संकल्पना नव्या पिढीमध्ये रूजवायची आहे. त्यासाठीच पंच प्रण (शपथ) नागरिकांनी घेणे अपेक्षित आहे. पंच प्रण यातील नागरिकांचे कर्तव्य हादेखील महत्वाचा भाग असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागरिकांच्या कर्तव्यामुळेच देशाच्या प्रगतीचा दर वाढू शकतो. ‘माझी माती, माझा देश’ यासारख्या उपक्रमातून शहिदांच्या स्मृती चिरंतन ठेवणारे वन विकसित करण्यात येणार आहे. अशा उपक्रमातून भारताची ताकद दाखवणे हा उद्देश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई बदलत आहे. मुंबईतील सुशोभीकरण आणि सिमेंट काँक्रिटचे रस्ते हे त्याचे ठळक उदाहरण आहे. अशा शब्दातही त्यांनी महानगरपालिकेच्या कामांचे कौतुक केले.


 *मुंबईकरांच्या स्पिरीटचे कौतुक –अजित पवार*


अभियानाच्या निमित्ताने देशभक्तीची ज्योत कायम प्रज्ज्वलित राहील, तसेच वीरांच्या बलिदानाचा इतिहास हा पुढील पिढीपर्यंत पोहचेल, यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत. नव्या पिढीला शहिदांचे योगदान, ज्यांनी देशाचा गौरव वाढवला, अशा मागील पिढीची जाणीव करून देणे आवश्यक आहे. वीरांप्रति ऋण व्यक्त करतानाच विकासाची प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. त्याच दृष्टीने नव्या पिढीने वाटचाल करणेही गरजेचे आहे. त्यासोबतच जातीय आणि धार्मिक वाद टाळून देशाची एकजूट कायम राहील, यादृष्टीने प्रयत्न हाणे आवश्यक आहे. स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन अशा अनेक आंदोलनात मुंबईकर नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. मुंबईवर येणारी अनेक नैसर्गिक संकटे व आपत्ती यांच्या आव्हानांवर मात करत मुंबईकरांनी ‘मुंबई स्पिरीट’ कायम ठेवले आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी कौतुक केले. ऑगस्ट क्रांती मैदानाचा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, याअनुषंगाने काही सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांना केल्या होत्या. महानगरपालिका प्रशासनाने विविध दर्जेदार कामे करून या मैदानातील ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जी कामगिरी बजावली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री  पवार यांनी महानगरपालिका प्रशासनाची पाठ थोपटली.


विविध उपक्रम राबविणार-


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेतातील २४ वॉर्डमध्ये 'माझी माती माझा देश' या अभियान अंतर्गत ९ ते १४ ऑगस्टदरम्यान पंच प्रण (शपथ), वसुधा वंदन करण्यात येणार आहे. तसेच शहर, पूर्व उपनगरे, पश्चिम उपनगरे अशा तीन ठिकाणी ७५ स्थानिक प्रजातीच्या वृक्षरोपांची लागवड करुन अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे. याशिवाय वार्डस्तरावर ‘वीरांना वंदन’ करण्यात येणार आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व विभाग कार्यालय, शाळा, कार्यालये इत्यादी ठिकाणी दिनांक ९ ते १४ या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविणे व राष्ट्रगीत गायन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. माटी यात्रासाठी प्रत्येक प्रभागातून आणलेली माती एका कलशामध्ये गोळा करून तो कलश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. हा कलश जिल्हाधिकारी यांचेकडून दिनांक २७ ते ३० ऑगस्ट दरम्यान दिल्ली येथे होणाऱया मुख्य समारोहासाठी रवाना करण्यात येणार आहे. तसेच दिनांक १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमांतर्गत घरोघरी राष्ट्रध्वज फडकविला जाणार आहे.