वारकर्‍यांवर लाठीचार्जची घटना काळीमा फासणारी, पुण्याच्या पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा ; राष्ट्रवादीची मागणी

Santosh Gaikwad June 12, 2023 10:48 PM


मुंबई दि. १२ जून - आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज म्हणजे महाराष्ट्राच्या ३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे, त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.


तपासे म्हणाले की, वारकर्‍यांवर लाठीचार्ज झालाच नाही असे वक्तव्य पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्तांनी केले तर दुसरीकडे तीच री गृहमंत्र्यांनी ओढली. मात्र समाजमाध्यमांवर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला तो बोलका आहे त्यामुळे वारकर्‍यांवर लाठीचार्ज करणारी व काळीमा फासणारी घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोपही त्यांनी केला. 


गेल्या काही दिवसापासून राज्यात धार्मिक ध्रुवीकरणाच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अहमदनगर, कोल्हापूर असेल किंवा नांदेडमधील दलित तरुणाची हत्या असेल, छत्रपती संभाजीनगरमधील घटना असेल, किंवा त्र्यंबकेश्वरमधील घटना असेल यामागे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे का किंवा जाणुनबुजुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का असा संशयही महेश तपासे यांनी यावेळी उपस्थित केला. 


काही घटनांमध्ये जुन्या इतिहासाचे दाखले दिले जातात. काही तरुण औरंगजेबाचे पोस्टर झळकवतात. या गोष्टी होत असताना राज्यात पोलीस यंत्रणेची कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम असताना त्यांच्याकडून ते काम होत नाही. धार्मिक हिंसाचारामुळे त्या - त्या शहराचे नुकसान होत आहे हे काही दिवसातून लक्षात येत आहे. या घटनांतून महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्र शांत राखण्याची, धार्मिक सलोखा राखण्यासाठी, महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन महेश तपासे यांनी यावेळी केले. 

------------