L&T मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या सहजा यमलापल्लीचा मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय

Santosh Sakpal February 05, 2024 09:52 PM

 

मुंबई ५ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित L&T मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत भारताची दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू सहजा यमलापल्ली हीने अमेरिकेच्या अव्वल मानांकित खेळाडू कायला डे हिचा पराभव करून सनसनाटी विजयाची नोंद केली.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या जागतिक क्रमवारीत ३३५व्या स्थानी असलेल्या सहजा यमलापल्ली हीने अमेरिकेच्या अव्वल मानांकित खेळाडू कायला डेवर ६-४ १-६, ६-४ असा तीन सेटमध्ये पराभव केला. हा सामना २तास ४३मिनिटे चालला.

लकी लुझर ठरलेल्या कोरियाच्या सोहयुन पार्क हिने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या वैष्णवी आडकरचा ६-२, २-६, ६-१ असा संघर्षपूर्ण पराभव केला. जपानच्या हिमेनो साकात्सुमेने माघार घेतल्यामुळे सोहयुन पार्कने लकी लुझर म्हणून मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला. १९ वर्षीय व जागतिक क्रमवारीत ८४१व्या स्थानी असलेली वैष्णवी आडकरने पार्कला विजयासाठी झुंजवले. पार्क हिने वैष्णवीवर दोन तासात विजय मिळवला. स्पेन येथे राफेल नदाल अकादमीत प्रशिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय अलिना कॉर्निवा हिने फ्रान्सच्या क्लोई पेक्वेटचा ६-१, ६-३ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. कॉर्निवा हिने २०२३मध्ये ऑस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन स्पर्धेत कुमार गटात एकेरीत विजेतेपद पटकावले असून जागतिक क्रमवारीत देखील ती अव्वल स्थानी होती. तसेच, प्रो टूरमध्ये देखील तिने जागतिक क्रमवीरत अव्वल १५० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे.

दुहेरीत पहिल्या फेरीत ग्रेट ब्रिटनच्या नैकिता बेन्स व हंगेरीच्या फॅनी स्टोलर यांनी वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या ऋतुजा भोसले व अंकिता रैना यांचा ३-६, ६-२, १०-८ असा पराभव करून आगेकूच केली.

निकाल: मुख्य ड्रॉ: पहिली फेरी: एकेरी:
सहजा यमलापल्ली(भारत)वि.वि.कायला डे(अमेरिका)(१) ६-४,१-६,६-४;
दरजा सेमेनिस्तेजा(लात्विया)(६)वि.वि. पन्ना उदवर्दी(हंगेरी)७-५, ३-६, ६-२;
एरियन हार्टोनो(नेदरलँड)वि.वि.इरिना बारा(रशिया)६-४, ६-४;
अलिना कॉर्निवा वि.वि.क्लोई पेक्वेट(फ्रांस)६-१, ६-३;
लॉरा पिगोसी(ब्राझील)(५) वि.वि.एकतेरिना मकारोवा(रशिया)६-१, ३-०सामना सोडून दिला;
सोहयुन पार्क(कोरिया)वि.वि.वैष्णवी आडकर(भारत)६-२, २-६, ६-१;

दुहेरी गट: पहिली फेरी:
नैकिता बेन्स(ग्रेट ब्रिटन)/फॅनी स्टोलर(हंगेरी)वि.वि.ऋतुजा भोसले(भारत)/अंकिता रैना(भारत)३-६, ६-२, १०-८.