L&T मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत एकेरीत लात्वियाच्या दरजा सेमेनिस्तेजा हिला विजेतेपद

Santosh Sakpal February 11, 2024 10:55 PM

मुंबई ११ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत एकेरीत लात्वियाच्या दरजा सेमेनिस्तेजा हीने विजेतेपद संपादन केले.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत लात्वियाच्या सहाव्या मानांकित दरजा सेमेनिस्तेजा हीने ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटरचा ५-७, ७-६(६), ६-२ असा पराभव केला. हा सामना २तास ३०मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. सामन्यात बरोबरी असताना स्टॉर्मने परतिचे सुरेख फटके लावत १२व्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ७-५ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये दरजाने वेगवान खेळ करत हा सेट ७-६(६) असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये दरजाने आपला खेळ उंचावत स्टॉर्मची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट ६-२ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.

दरजा हीने याआधी मागील महिन्यात बेंगळुरू येथील ५००००डॉलर आयटीएफ स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते. तिचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे. स्पर्धेतील विजेत्या दरजा सेमेनिस्तेजा हिला

करंडक, १५०००डॉलर व १२५डब्लूटीए गुण, तर उपविजेत्या स्टॉर्म हंटरला करंडक, ८००२डॉलर, ८१डब्लूटीए गुण अशी पारितोषिके देण्यात आली.

एकेरी: अंतिम फेरी:

दरजा सेमेनिस्तेजा(लात्विया)(६)वि.वि.स्टॉर्म हंटर(ऑस्ट्रेलिया)५-७, ७-६(६), ६-२.