काळाचा घाला : इर्शाळवाडी गावावर दरड कोसळली, अख्खं गाव ढिगा-याखाली !

Santosh Gaikwad July 20, 2023 08:55 AM


रायगड : जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे मोठी दुर्घटना घडली आहे. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच दरड कोसळल्याने अख्ख गाव दरड खाली दबला गेला. या दुर्घटनेत आतापर्यंत चारजणांचा मृत्यू झाला आहे. तर दरडीखाली ५० ते ६० घरे आणि तब्बल १०० ते १२० लोक ढिगा-याखाली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत २५  लोकांना या दरडीखालून काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. ही घटना काल (बुधवार, १९ जुलै) रात्री ११.३० ते १२ च्या दरम्यान घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या दुर्घटनेने माळीण दरड दुर्घटनेच्या भयंकर आठवणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.


मुसळधार पाऊस, रात्रीचा अधार, निसरडी जमीन यासारख्या कारणांमुळे जेसीबी, पोकलेन नेण्यास अडथळे येत आहेत. त्यामुळे केवळ मनुष्यबळाच्या आधारेच सध्या बचावकार्य सुरु आहे. अनेक अडचणींचे डोंगर फोडत, अडथळे पार करत बचावकार्य केले जात आहे. डोंगर उतरुन येण्यास एक ते दीड तासाचा अवधी लागत असल्याने जखमींना खाली आणण्यास विलंब होत असल्याचाही दावा केला जात आहे.



एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. या गावात सुमारे ४० घरे असून ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच ही दरड कोसळली.  प्राथमिक माहितीनुसार ही ६५ घरांची वस्ती असून त्यातील जवळपास २५ ते ३० घरांवर दरड कोसळली असून जमीन उद्ध्वस्त झाली आहे. एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. तर दुर्दैवाने सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. 


मख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी


घटनेची माहिती मिळताच सकाळी सातच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले. शिंदे यांनी इर्शाळवाडीतील परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच संबंधितांना बचावकार्याबाबत सूचनाही केल्या. "राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन यंत्रणा सतर्क आहेत. आवश्यकता भासेल तिथे लोकांना हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांची जीवितहानी होऊ नये, यासाठी आमची यंत्रणा काम करत आहे. ज्या ज्या ठिकाणी पूराचा धोका आहे, तिथे एनडीआरफ तैनात करण्यात आलेलं आहे", अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.