कर्नाटक जनतेने मोदी, शहा यांना नाकारले : संजय राऊत

Santosh Gaikwad May 13, 2023 02:11 PM


मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेस १३४ जागांवर आघाडीवर असून बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत आहे तर भाजप ६७ जागांवर आघाडीवर आहेत. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला डिवचले आहे. कर्नाटकच्या जनतेने मोदी आणि शाह यांना झिडकारले आहे. हा मोदी आणि शाह यांचा पराभव आहे. या पराभवाचा त्यांनी स्वीकार केला पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले. 


कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी स्वत: मैदानात उतरुन प्रचार केला होता. या दोन्ही नेत्यांनी कर्नाटकमध्ये रोड शो आणि जाहीर सभा घेतल्या होत्या. मात्र, स्टार प्रचारक आणि सर्व यंत्रणा पणाला लावूनही कर्नाटकमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. हाच धागा पकडत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना खडे बोल सुनावले. कर्नाटकात काँग्रेस जिंकत असेल तर तो पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचा पराभव आहे.  कर्नाटकात श्रीराम आणि बजरंगबली सत्याच्या बाजूने आले. देशात २०२४ साली जे होणार आहे, तेच आत्ता कर्नाटकमध्ये घडत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.


‘मोदी है तो मुनकीन है’ असे म्हणणा-यांना चपराक 


ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही  ‘पप्पू पास नही हो गया, पप्पू मेरिट मे आ गया’ असं म्हणत भाजपवर चांगलीचं टीका केली आहे. तर ‘मोदी है तो मुनकीन है’ असे म्हणनाऱ्या लोकांना कर्नाटकचा हा निकाल भक्तजनांसाठी चपराक आहे. तर ज्या राहुल गांधींना भाजपच्या स्लीपर सेल ने पप्पू म्हणून हिणवलं ते तर सर्वांचे बाप निघाले. तसेच यावेळी त्यांनी, फडणवीस यांना लक्ष्य करताना, फडणवीसांनी कर्नाटकात जाऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, गरज नसताना बजरंगबलीचा मुद्दा फडणवीसांनी काढला. या सगळ्याचा तिथे अजिबात फायदा झाला नाही. त्यामुळे आता असे कार्ड ते महाराष्ट्रात वापरताना दहा वेळा विचार करतील अशा शब्दांत अंधारेंनी भाजपसह फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

--------------