कल्याणात ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी !

Santosh Gaikwad April 03, 2024 03:55 PM


कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघातून उध्दव ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे खासदार डॉ श्रीकांत शिंदे विरोधात वैशाली दरेकर असा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे दरेकर यांनी २००९ मध्ये कल्याण मतदार संघातून निवडणूक लढवली होती.


कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाकडे आली आहे. तर, महायुतीत या जागेवरून भाजपा आणि शिंदे गटात धुसफूस सुरू आहे. शिंदे गटाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघात खासदार असतानाही त्यांना या जागेवरून पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. तर, ठाकरे गटाकडे या जागेसाठी तुल्यबळ उमेदवार सापडत नसल्याचं म्हटलं जात होतं. अखेर ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. वैशाली दरेकर यांनी २००९ साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणूक लढली होती. मात्र दरम्यानच्या काळात त्या पुन्हा स्वगृही परतल्या आहेत.

कोण आहेत दरेकर..
कल्याण डोंबिवली महापालिकेत नगरसेविका ते विरोधी पक्षनेता पद त्यांनी भूषविले आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत त्यांचा दांडगा संपर्क आहे. शिवसेना मनसे असा प्रवास असल्याने दोन्ही पक्षात त्यांचा संपर्क असल्याने त्याचा फायदा होऊ शकतो.