डॉ श्रीकांत शिंदेकडून उमेदवारी अर्ज दाखल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या विजयी हॅट्रीकच्या शुभेच्छा !

Santosh Gaikwad 20, 5-02 07:05 PM


डोंबिवली : कल्याण लोकसभेला एक आदर्श, काम करणारा, संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार मिळाला आहे. गेल्या १० वर्षांत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती आजच्या मिरवणुकीत नागरिकांनी दिलेली आहे. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांना आपण आता थेट विजयाच्या आणि हॅटट्रिकच्या शुभेच्छा देऊया, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह महायुतीचे आमदार आणि नेते आज डोंबिवलीत उपस्थित होते. अर्ज भरण्यापूर्वी काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने नागरिक या उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. कल्याण लोकसभेच्या विकासासाठी निधीची कुठलीही कमी भासू देणार नाही याची खात्री मी देतो, असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. कामाच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे बूथ लेव्हलला काम करा आणि बूथ जिंका. मतदान वाढेल असे काम केले पाहिजे, तरच डॉ. श्रीकांत शिंदे यांना मताधिक्याचा रेकॉर्ड मोडता येईल, असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले. उन्हाळी सुट्टी आणि लग्न सराईमध्ये काही लोक गावी गेले आहेत. त्या सर्वांना विनंती करून डॉ. श्रीकांत शिंदे यांना मतदान करा, असे आवाहन करायचे आहे. तरच नवा विक्रम आपण नोंदवू. डॉ. श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे मोदीजींना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत, महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी २० तारखेपर्यंत मेहनत करायची आहे. २० तारखेनंतर पुढील ५ वर्ष खासदार मेहनत करतील आणि मतदारसंघाची सेवा करतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.





त्यापूर्वी ठाणे येथील निवासस्थानी औक्षण करून वडिलधाऱ्यांचे आशिर्वाद घेत डॉ. श्रीकांत शिंदे डोंबिवलीकडे रवाना झाले. डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात जात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक दर्शन घेत आपल्या रॅलीला सुरूवात केली. आप्पा दातार चौकातून डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागातून लोकमान्य टिळक चौकामार्गे संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत ही रॅली निघाली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांच्यासह मित्रपक्षाचे  पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनीही मिरवणुकीत सहभाग नोंदवला. श्री गणेश मंदिरापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत विविध भाषिक, विविध संस्था, संघटनांचे सदस्य सहभागी झाले. पंजाबी, दाक्षिणात्य, आगरी कोळी बॅंड पथक, वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात या मिरवणुकीची सुरूवात झाली. महायुतीच्या सर्व घटकपक्षांनी यावेळी शक्तीप्रदर्शन केले. महायुतीच्या घोषणांनी यावेळी डोंबिवलीतील रस्ते दुमदुमून गेले. उन्हाचा पारा चढलेला असतानाही मिरवणुकीतील गर्दीवर काहीही परिणाम झाला नव्हता. दुपारी बाराच्या सुमारास घरडा सर्कल चौकात मिरवणुकीची सांगता झाली. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तिसऱ्यांदा कल्याण लोकसभेसाठी उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे, मुख्यमंत्र्यांचे वडील श्री. संभाजी शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी सौ. वृषाली शिंदे आणि मुलगा रूद्रांश शिंदे असे संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होते.