पत्रकारांची पेन्शन आणि घरांचा प्रश्न मार्गी लावणार : नरेंद्र वाबळे यांचे प्रतिपादन

Santosh Gaikwad January 08, 2024 06:55 PM


डोंबिवली : बदलत्या पत्रकारितेत पत्रकारांसमोर अनेक आव्हान आहेत. पत्रकारांच्या पेन्शनचा आणि घरांच्या प्रश्नही महत्वाचा आहे. पत्रकारांचे हे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. कल्याण डेांबिवलीतील पत्रकारांच्या घरांच्या प्रश्नासाठी शासनदरबारी लढण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेन अशी ग्वाही मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवनेरचे संपादक नरेंद्र वि. वाबळे यांनी डोंबिवलीत पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

 

६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने बापू वैद्य पत्रकार संघ आणि सहकारी यांच्यावतीने शास्त्री हॉल येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाबळे बोलत होते. यावेळी प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, केडीएमसीचे उपायुक्त अवधूत  तावडे,  प्रभाग क्षेत्र अधिकारी  सोनम देशमुख,  चंद्रकांत जगताप,  कामाचे अध्यक्ष देवेन सोनी, पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते. 


यावेळी बोलताना वाबळे पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षात वृत्तपत्र क्षेत्रात खूपच बदल होत गेले. खिळे जुळवून केलेले ट्रेडल प्रिंटिंग ते सध्याचे डिजिटल प्रिंटिंग पर्यंतचे बदलत आपण पाहत आहोत. इलेक्ट्रॉनिक्स मिडीयातील तेच ते चेहरे आणि चर्चा पाहून लोक कंटाळली आहेत त्यामुळे त्यांचा टीआरपी घसरला असून आता युटयूबला अधिक पसंती असल्याचे त्यांनी सांगितले. त्याकाळात दै. शिवनेर ने गिरणी कामगारांच्या प्रश्नाला वाचा फोडली. दै. शिवनेरचे संस्थापक संपादक विश्वनाथराव वाबळे यांचे त्याकाळी गाजलेले अग्रलेख याचेही उदाहरणे त्यांनी दिली. लेखणीची ताकद खूप मोठी असून, त्याचा अनेकवेळा अनुभव आल्याचे किस्से त्यांनी सांगितले. तसेच वाबळे यांनी अनेक चारोळी सादर करीत पत्रकारांना मनमुराद हसविले. 



प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर म्हणाले की, पत्रकारितेला मोठी परंपरा आहे, पूर्वीच्या संपादकांमध्ये सरकारला हलविण्याची ताकद होती. आता ती ताकद राहिलेली नाही. सर्व संपादक हे कॉन्ट्रॅक्टवर आहेत.  भांडवलदारांची गुंतवणूक आल्याने  मालकाची भूमिका त्यांना मांडावी लागते. आज अग्रलेख लिहिणारे संपादक मिळत नाही. निवृत्त संपादकांकडून अग्रलेख लिहून घेतले जातात. पत्रकारितेत वेगाने बदल हेात आहे. इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाचा टीआरपी घसरत आहे. यूटूबला सर्वाधिक टीआरपी असल्याचे खांडेकर म्हणाले.  पत्रकाराने आपली भूमिका व्यवस्थित मांडली तर त्याला कुठेही काम करता येते. व्यक्ती द्वेषातून टीका कारण योग्य नाही सत्याचा शोध घेणे हे पत्रकाराचे काम आहे असेही खांडेकर यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त तावडे यांनीही भाषण करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद भानुशाली यांनी तर आभार सारिका शिंदे यांनी मानले.

 *****