छत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या द्या, महात्मा गांधींना द्या, आंबेडकरांना द्या; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

SANTOSH SAKPAL April 02, 2023 06:12 PM

ठाणे : बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री  यांनी साईबाबांबद्दल  केलेल्या विधानानंतर संताप व्यक्त होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही निशाणा साधला आहे.   

बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री  यांनी साईबाबांबद्दल एक धक्कादायक विधान केलं आहे. यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत कारवाईची मागणी केली जात आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विटरला एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात कोणालाही शिव्या दिल्या तरी कारवाई केली जाणार नाही याची खात्री आहे सांगत शिंदे सरकारला लक्ष्य केलं. 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरला पोस्टसहित एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. "जाहीर आमंत्रण! महाराष्ट्रात कोणालाही शिव्या द्या. छत्रपती शिवाजी महाराजांना द्या, जिजाऊ मातेला द्या, महात्मा गांधींना द्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना द्या, महात्मा फुलेंना द्या, क्रांतीज्योती सावित्री माईला द्या, छत्रपती शाहू महाराजांना द्या, साईबाबांना द्या. यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही याची खात्री आणि शाश्वती आहे. या लवकर या.  कुणालाही शिव्या घाला महापुरुषांना घाला, श्रद्धास्थानांना घाला. असं वातावरण परत मिळणार नाही," अशी उपहासात्मक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

व्हिडीओत जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आहेत?

"कालीचरण आला आणि महात्मा गांधींबद्दल बोलून गेला. आजकाल उघडपणे नथुराम म्हणजेच नथ्थूचं समर्थन सुरु आहे. बागेश्वर बाबा म्हणतो साईबाबा कोण? त्यांना कोण मानतं? त्यांचे करोडो भक्त असून मीदेखील भक्त आहे, म्हणूनच मी म्हणतो की ज्याला कोणाला शिव्या घालायच्या असतील त्याने महाराष्ट्रात यावं. आम्ही काहीच करणार नाही. सुप्रीम कोर्टाने म्हटल्याप्रमाणे आम्ही नपुंसक सरकार आहोत," असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. 

"महाराष्ट्रात येऊन शिव्या घालण्यासाठी मोकळं मैदान देण्यात आलं आहे. कारण मराठी माणूस आता सोशिक झाला आहे, तो कोणाबद्दल काहीच बोलत नाही. दुसरीकडे महाराष्ट्र सरकार नपुंसक आहे. कोणीही येऊन काहीही बोललं तर जाब विचारणार नाही, कारवाई करणार नाही. उलट पोलीस तुमचं संरक्षण करतील. हे सर्वांसाठी जाहीर आमंत्रण असून, वैयक्तिक स्वातंत्र्याचा आनंद घ्या," असा संताप आव्हाडांनी व्यक्त केला आहे. आज साईबाबांना शिव्या घालत आहेत, उद्या गजानन महाराजांनाही घाला असंही ते म्हणाले आहेत. श्रद्धास्थानवार येऊन कुदळ मारली तरी आम्ही काही बोलणार नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

"ज्यांनी बागेश्वरला बोलावलं होतं, त्यांनी त्यांच्या साईबाबांच्या विधानावर बोलावं. आता आम्ही बागेश्वर बाबा, कालीचरण महाराज यांना धडा शिकवू म्हटलं तर आमच्यावर लगेच कारवाई करतील," असा टोलाही त्यांनी लगावला.