तेंडल्या पुन्हा अवतरला अन् मुंबई इंडियन्सने विजयाची हॅटट्रिक साधली!

Santosh sakpal April 19, 2023 07:14 AM

हैदराबादवर १४ धावांनी रोमांचक विजय

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबईने १४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबईने २० षटकांत पाच गडी गमावून १९२ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ १९.५ षटकांत १७८ धावांत सर्वबाद झाला. शेवटच्या षटकात सचिन तेंडुलकर सुपुत्र अर्जुनने जि कमाल कामगिरी केली त्याने जणू मुबैकरांना वाटले आपला लाडका तेंडुलकर उर्फ तेंडल्या नव्या अवतारात सापडला.


राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या २५व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादचा १४ धावांनी पराभव करत विजयाची हॅटट्रिक नोंदवली. हैदराबादसमोर विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ १९.५ षटकांत १७८ धावांत सर्वबाद झाला. हैदराबादला शेवटच्या षटकात २० धावांची गरज होती, पण अर्जुन तेंडुलकरने केवळ ४ धावा दिल्या. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेटही घेतली. २०व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर त्याने भुवनेश्वर कुमारला कर्णधार रोहित शर्माकरवी झेलबाद केले.


हैदराबादकडून मयंक अग्रवालने सर्वाधिक ४८ तर हेनरिक क्लासेनने १६ चेंडूत ३६ धावांची स्फोटक खेळी केली. तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने कॅमेरून ग्रीनच्या ६४ आणि इशान किशनच्या ३८ धावांच्या जोरावर ५ गडी गमावून १९२ धावा केल्या.


Three wins in a row for the @mipaltan as they beat #SRH by 14 runs to add two key points to their tally.Scorecard – https://t.co/oWfswiuqls #TATAIPL #SRHvMI #IPL2023 pic.twitter.com/asznvdy1BS— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023

सनरायझर्स हैदराबादचा डाव –


१९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादची सुरुवात चांगली होऊ शकली नाही. त्यांनी अवघ्या ११ धावांवर पहिली विकेट गमावली. गेल्या सामन्यातील शतकवीर हॅरी ब्रूक ९ धावा करून बाद झाला. बेहरेनडॉर्फने त्याला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. लवकरच हैदराबादला आणखी एक धक्का बसला जेव्हा राहुल त्रिपाठी ७ धावा करून बेहरेनडॉर्फच्या चेंडूवर ईशान किशनकरवी झेलबाद झाला.


मयंक अग्रवाल आणि मार्कराम यांनी तिसर्‍या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या, परंतु २२ च्या वैयक्तिक धावसंख्येवर तो ग्रीनच्या चेंडूवर हृतिक शोकीनकरवी झेलबाद झाला. अभिषेक शर्माही लगेट १ धावा काढून बाद झाला. परंतु क्लासेन आणि अग्रवाल यांनी ५व्या विकेटसाठी झटपट ५५ धावा जोडून हैदराबादला सामन्यात ठेवले होते. क्लासेनने १६ चेंडूत ३६ धावांची स्फोटक खेळी खेळली. त्याला पियुष चावलाने बाद केले.

मुंबई इंडियन्सचा डाव –

प्रथम फलंदाजी करताना मुंबईने सनरायझर्स हैदराबादसमोर १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक ६४ धावांची खेळी खेळली. ग्रीनशिवाय तिलक वर्माने १६ चेंडूत ३७ धावा केल्या. तत्पूर्वी, रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी मुंबईच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४.४ षटकात ४१ धावा जोडल्या. यादरम्यान रोहित शर्माने आयपीएल कारकिर्दीतील ६ हजार धावा पूर्ण केल्या. त्याला टी नटराजनने २८ धावांवर बाद केले.

ग्रीन आणि इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली, पण किशनचे अर्धशतक हुकले. मार्को जॅनसेनने ३८ धावांवर त्याला बाद केले. मुंबईला तिसरा धक्का सूर्यकुमार यादवच्या रूपाने बसला जो ७ धावा काढून बाद झाला. तिलक वर्मा आणि ग्रीन यांनी चौथ्या विकेटसाठी झटपट ५६ धावा जोडल्या, पण १६ चेंडूत ३७ धावांची स्फोटक खेळी खेळल्यानंतर तिलक भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर मयंक अग्रवालच्या हाती झेलबाद झाला.